शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट झूम कॉलद्वारे बार्शीचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संवाद साधला. बार्शीतील कोरोनाची परिस्थिती, त्यांच्या प्रकृती आणि तालुक्या संदर्भातील विविध विषयावर या झूम कॉलमध्ये चर्चा झाली. त्यावेळी, सुरुवातीलाच बोलताना, दिलीपराव कसे आहात? काय म्हणतेय बार्शी... असे आपुलकीचे शब्द वापरुन उद्धव ठाकरेंनी चर्चेला सुरूवात केली.
काळजी करायची नाही, सरकार तुमच्यासोबत आहे. आम्ही तुम्हाला आजही आमदारच समजतो. तुमच्या सगळ्या सूचना, मागण्या व तक्रारींवर लवकरात लवकर मार्ग काढुयात, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याचे माहिती दिलीप सोपल यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांसमेवतच्या बैठकीत तालुक्यातील विविध प्रश्नांवर आणि आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भातही चर्चा झाली. त्यासाठी, मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणीही सोपल यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे हेही उपस्थित होते.
बार्शी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळालेली आहे तसेच वैराग ग्रामीण रुग्णालय मंजुरी मिळाली आहे या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशी विनंती करत वैराग तालुका निर्मितीचे आपण आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता करावी. आगामी बार्शी नगरपालिका व वैराग नगरपंचायत पार्श्वभूमीवर आपल्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊन निवडणूकपुर्व चर्चा विचारविनिमय व्हावा. काही भ्रष्टाचार तक्रारी वर महत्वपूर्ण चौकश्या लावाव्यात, बार्शी उपसा सिंचन, बार्शी एम आय डी सी, जवळगाव बंदीस्त पाईपलाईन, बाभूळगाव मध्यम प्रकल्पात उजनीचे पाण्याची सध्यस्थिती, प्रगती आढावा, यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी, अशा विविध मागण्या सोपल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सोपल यांनी सांगितले.