सोलापूर : पंढरपूर लाडक्या पांडुरंगाची आस लागलेल्या भाविकांना यंदाही आषाढी सोहळ्याला मुकावे लागणार आहे. प्रथेनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मंदिरात महापूजेच्या वेळी मंदिरात फक्त ठाकरे फॅमिलीच असतील. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशिवाय कोणाही राजकीय नेत्याला प्रवेश नसेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून शनिवारी मंदिर समितीचे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांची तुकाराम भवन येथे चाचणी करण्यात आली. हा अहवाल रविवारी प्राप्त होईल. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या सर्वांना मंदिरातील कार्यक्रमास प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाडी यांनी दिली.
या महापूजेच्या निमित्ताने मंदिर समिती प्रशासनाची लगबग सुरू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी, विठ्ठल सभामंडप, चौखांबी, सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा सजविण्यात आला आहे.