सोलापूर : शालेय शिक्षणात अन्नसाखळी म्हणजे काय हे शिकविले जाते. पण, प्रत्यक्षात ते दाखवणे अवघड असते. विजापूर रोड परिसरात पालीने झुरळाला तर त्याचवेळी कवड्या सापाने पालीला भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रत्यक्षदर्शींना अन्नसाखळीचा प्रत्यय आला; पण सापाचे अर्धे शरीर दरवाजाच्या चौकटीत अडकल्याने त्याला पालीला भक्ष्य करता आले नाही.
शनिवारी रात्री १२ वाजता इंचगिरी मठ शेजारील तुलसी विहार येथील अमित हविनाळे यांच्या राहत्या घरी साप आढळल्याची माहिती सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना मिळाली. त्यांनी सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना या घटनेची माहिती दिली. काही वेळातच भीमसेन लोकरे व सोमेश्वर चौलगी हे घटनास्थळी पोहोचले.
एक ‘पाल’ भिंतीवरील झुरळ तोंडात पकडून भक्षण करत असतानाच एका ‘कवड्या’ जातीच्या बिनविषारी सापाने स्वतःचे भक्ष्य बनविण्यासाठी पालीला वेटोळे घातले होते. एकाचवेळी पालीने झुरळाला तर सापाने पालीला खाण्याचा प्रयत्न केला. सापाचे अर्धे शरीर दरवाजाच्या चौकटीत दुसऱ्या बाजूस अडकल्याने त्याला पालीला खाता येत नव्हते. तसेच पाल मोठी असल्याने सापास पालीला गिळणे शक्य नव्हते.
कोणताही साप भक्ष्य खाल्ले असता त्यांना सर्पमित्र सुरक्षित पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो साप आपला गिळलेला भक्ष्य बाहेर काढतो. त्यामुळे सर्पमित्रांनी तिथली परिस्थिती पाहून सापाच्या विळख्यातील पालीची सुटका केली. त्यानंतर सापास सुरक्षितरित्या निसर्गात मुक्त केले.