मोठी बातमी; चारचाकी वाहनधारकांनी फास्टटॅग न बसविल्यास दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:40 PM2021-01-06T12:40:52+5:302021-01-06T12:41:34+5:30
सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा इशारा
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर 1 जानेवारी 2021 पासून टोल वसुलीची प्रक्रिया फास्टटॅगद्वारे सुरू झाली आहे. चारचाकी वाहनधारकांनी तत्काळ फास्टटॅग बसवून घ्यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने (एम) आणि मालवाहतूक करणारी चारचाकी वाहने (एन) या संवर्गाच्या वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य केले आहे. टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत, टोलवसुलीची प्रक्रिया सुरळित होण्यासाठी फास्टटॅग महत्वाचे आहे. संबंधित विक्रेते, वाहतूकदार आणि टॅक्सी युनियन यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
वाहन फास्टटॅगशिवाय रस्त्यावर आढळून आल्यास मोटार वाहन कायदा 1988मधील कलम 177 नुसार 200 रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे डोळे यांनी सांगितले.