आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मध्य रेल्वे प्रशासनाने अनारक्षित गाड्यांना सिझन तिकीट (मासिक पास) ही सुविधा सुरू केली आहे. मात्र, याचा फायदा सोलापूर विभागातून धावणाऱ्या फक्त पॅसेंजर गाड्यांनाच लागू होत आहे. त्यामुळे दररोज एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशाला पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. याचा फटका ३ हजार पासधारकांना बसत आहे.
सोलापूर विभागातून धावणाऱ्या कोणत्याही एक्स्प्रेस गाड्यांसाठी सिझन तिकिटाची सुविधा उपलब्ध नाही. दररोज सोलापूरहून कुर्डूवाडी, वाडी, पुणे, मुंबई, विजापूर, गुलबर्गा, दौंड आदी ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक्स्प्रेस गाड्यांमधील तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे.
कोरोनाच्या काळात रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. त्याचकाळात रेल्वेमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधा बंद केल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी यांच्यासह मासिक पासधारकांची सुविधाही बंद केली होती. कोरोना आटोक्यात आल्यानंतर रेल्वेने सर्व गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार सोलापूर विभागातून सध्या ८५ टक्के गाड्या नियमितपणे धावू लागल्या आहेत. मात्र, मासिक पासची सुविधा फक्त ५ ते १० टक्के गाड्यांमध्ये लागू असल्याचे सांगण्यात आले.
--------
आरक्षित गाडयांमध्ये सुविधा नाहीच...
मध्य रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर, भुसावळ या विभागात सिझन पास सुरू करण्यात असल्याचे पत्रक प्रसिध्दीस दिले होते. दरम्यान, या पत्रात आरक्षित गाड्या वगळण्यात आल्या आहेत. मासिक पासधारक प्रवाशाला अनारक्षित गाड्यांमध्येच प्रवासाची मुभा आहे.
---------
केवळ पॅसेंजर गाड्या...
मध्य रेल्वेने काढलेल्या नव्या आदेशात पूर्णपणे अनारक्षित गाड्यांनाच मासिक पास (सिझन तिकीट) लागू करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले.
-------
या गाड्यांमध्ये सिझन पासला परवानगी...
- - पुणे-सोलापूर
- - सोलापूर-वाडी
- - दौंड-पुणे
- - सोलापूर-धारवाड
- - सोलापूर-हुबळी
---------
३७० रुपयांसाठी ४ हजारांचा खर्च
वास्तविक पाहता सोलापूर - कुर्डूवाडी नियमित प्रवास करणाऱ्या पासधारकाला प्रतिमहिना ३७० रुपये पाससाठी भरावे लागत होते. मात्र, आता मासिक पास सेवा बंद केल्याने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दररोज एक्स्प्रेसचे तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे त्या प्रवाशाला महिन्याला ४ हजार २०० रुपये खर्च करावा लागत आहे.
---------
सोलापूर विभागात रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सर्वच गाड्यांमध्ये पासची सुविधा सुरू करायला हवी. सुरू झालेल्या पॅसेंजर गाड्या नियमितपणे वेळेवर धावत नाहीत. त्या गाड्यांमध्ये पासची सुविधा देऊन काय उपयोग आहे. त्या तर पॅसेंजर गाड्या वेळेवर व नियमित सोडा.
- संजय पाटील, रेल्वे प्रवासी संघ, सोलापूर