मोठी बातमी; सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 07:12 PM2022-02-04T19:12:16+5:302022-02-04T19:12:19+5:30

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत निर्णय

Big news; Schools in Solapur district will start from Monday | मोठी बातमी; सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होणार

मोठी बातमी; सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होणार

googlenewsNext

सोलापूर :  जिल्ह्यातील कोरोनाचे रूग्ण कमी होऊ लागले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दरसुद्धा कमी होत आहे. शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवारपासून (दि.7 फेब्रुवारी 2022) इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे, जि.प.चे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, मनपाचे कादर शेख आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व प्रांताधिकारी यांच्याकडून प्रत्येक ठिकाणची कोरोनाची परिस्थिती आणि शाळा सुरू करण्याबाबतची मते जाणून घेतली. शाळा सुरू करण्याबाबत पालकांच्या मागण्या येत आहेत, पंढरपूर, माळशिरस, बार्शी तालुके सोडले तर कोरोना रूग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे मत प्रांताधिकाऱ्यांनी नोंदवले.

 प्राधिकरणने शासनाने कोरोनाविषयक घालून दिलेले नियम पाळून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सक्तीने मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर, हात वारंवार साबणाने धुणे, शाळेतील स्वच्छता या अटीवर शाळा सुरू करण्यात येणार आहेत, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात पहिली ते 12 वीपर्यंत सर्व माध्यमाचे सुमारे चार लाख 88 हजार 401 विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्कचा वापर करावा लागणार आहे. त्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यायची आहे. शिक्षकासह पालकांनीही मुलांची काळजी घ्यावी. कमी दप्तर, डबा, सॅनिटायझर, मास्क वापरणे,  हात धुणे या बाबी मुलांना समजावून द्याव्यात. मुलांना खेळताना, शाळेत बसताना शारिरीक अंतराचे महत्व पटवून द्यावे, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषद, समाजकल्याणच्या शाळा, नवोदय विद्यालय, होस्टेल हे अटीच्या अधिन राहून सुरू करण्यात येणार आहेत.

पालकांना दोन्ही डोस घेणे बंधनकारक

ज्यांचे पाल्य शाळेत जात आहे, त्या पालकांना कोरोनाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. शिवाय घरातील 15 वर्षांवरील सर्वांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे, अशा सूचनाही देण्यात येणार आहेत.

फिरते पथक करणार तपासणी

शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर पाळायचे आहे. मास्कचा वापर करायचा आहे. शाळेमध्ये कोरोनाविषयक त्रिसूत्रीच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी फिरत्या पथकाद्वारे केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिली.

********

 

 

Web Title: Big news; Schools in Solapur district will start from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.