सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाच्या सिनेट सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राज्यसभा खासदार पद्मविभूषण शरद पवार यांना डी.लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी देण्याचा ठराव संमत झाला आहे. सोमवारी झालेल्या २३ व्या बैठकीत हा ठराव सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी मांडला. याला सिनेट सदस्य राजा सरवदे, प्रा. राजेंद्र गायकवाड, ङाॅ. चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. त्यास अधिसभेने बहुमताने मान्यता दिली.
सिनेट सभेत मंजुरीनंतर या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे गरजेचे असते. त्यानंतर या प्रस्तावाला राज्यपाल कार्यालयातून मंजुरी मिळल्यानंतर पदवीदान समारंभ होतो. सोलापूर विद्यापीठाने २०१४ मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सर्वप्रथम डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते. तसेच सोलापूर विद्यापीठाची पहिली डी.लिट. पदवी ही म सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली.