नवी मुंबई/सोलापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कारचा नेरुळच्या एलपी पुलावर अपघात झाला. पोलीस सुरक्षेत ते मुंबईच्या दिशेने जात असताना, एक खासगी कार त्यांच्या ताफ्यात घुसली. या एस्कॉर्टमधील कारची कारला धडक लागल्याने पाठीमागून येणारी भरणे यांची कार एस्कॉर्टला धडकली. या राज्यमंत्री भरणे हे थोडक्यात बचावले असून, तीन कारचे नुकसान झाले आहे.
राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे गुरुवारी मुंबईला जात असताना हा अपघात झाला. त्यांची कार नेरूळच्या एलपी पुलावर आली असता, पुढे पोलिसांची एस्कॉर्ट कार होती. पोलीस बंदोबस्तात त्यांना मुंबईच्या दिशेने नेले जात असतानाच नेरुळ पुलावर दुसऱ्या लेनमधील एक कार अचानक पहिल्या लेनमधील ताफ्यात घुसली. शिवाय या कार चालकाने एस्कॉर्ट कारच्या दुर्घटनेत मंत्री भरणे व पोलीस पुढे जाऊन अचानक ब्रेक दाबल्याने पोलिसांची एस्कॉर्ट कार त्या कारला धडकली. त्यामुळे पाठीमागून येणारी भरणे यांची कार (एमएच ०९ डीटी ०२२२) एस्कॉर्टला धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
या दुर्घटनेत एस्कॉर्टमधील पोलिसांसह मंत्री भरणे यांच्यावरील संकट थोडक्यात टळले. मात्र खासगी कारसह एस्कॉर्ट कार व भरणे यांच्या कारचे नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी खासगी कार चालक हरेश सरमळकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.