मोठी बातमी; कोकणातील भूस्खलन रोखण्यासाठी सोलापूर विद्यापीठ करणार संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 01:23 PM2021-08-07T13:23:26+5:302021-08-07T13:24:31+5:30
राज्य शासनाकडून अनुदान : दरड कोसळण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास
सोलापूर : महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतरांगा, कोकण परिसरात पावसामुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला अनुदान प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी पश्चिम घाटातील कोकण भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर तसेच डोंगर कडेला असलेल्या वस्तीवर दरड कोसळण्याच्या घटनेने जीवितहानी झाली होती. या घटनेत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून, यासाठी सोलापूर विद्यापीठाची मदत घेत आहे.
विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलातील डॉ. धवल कुलकर्णी व योगेश दुरुगवार यांना राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनतर्फे भूस्खलन आराखडा व तपासणीसाठी संशोधनात्मक अनुदान मिळाले आहे. त्याअंतर्गत प्रामुख्याने पश्चिम घाट तसेच कोकण भूभागामधील रस्ते, रेल्वेचे मार्ग व डोंगर कपारीजवळील रहिवासी गावालगतच्या भागाचे भूस्खलन सर्वेक्षण होणार आहे. हा सर्व संशोधनात्मक प्रकल्प अहवाल येत्या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाला सुपूर्द करण्यात येणार आहे.
----------
...असे होणार संशोधन
या सर्वेक्षणामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), जिओटेक्निकल तंत्र, ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) व इलेक्ट्रीकल रेझिस्टीव्हीटी या उपकरणाद्वारे भूस्खलनाचा अभ्यास करण्यात येणार आहे. या संशोधनात भूस्खलन जागेचे नाव, स्थान, भूस्खलनाचा प्रकार, शेवटची घटना कधी घडली, सध्याची स्थिती नोंदविण्यात येणार आहे. भूस्खलन भूमिती, पृष्ठभागाची खोली, भौतिक गुणधर्म, जलविज्ञानशास्त्र, उतार भूमिती यांच्या प्रभावामुळे होणाऱ्या भूस्खलनाद्वारे जीवित व आर्थिक नुकसान टाळता येण्यासाठी उपाय सुचविण्यात येणार आहे.
-----