मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइनच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 02:55 PM2021-12-06T14:55:44+5:302021-12-06T14:55:50+5:30
संमिश्र परीक्षेचा निर्णय रद्द : अंतिम वर्षाच्या परीक्षांनाही निर्णय लागू
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या काही परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार होत्या. मात्र, विद्यापीठाकडून आता सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी सोलापूर व महापालिका आयुक्त यांच्याकडून कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे लसीकरण किंवा ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी येण्यासाठी सर्वांचे लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांमुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे अडचणीचे ठरू शकते.
यापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ सर्व वर्षांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा या संमिश्र (ऑनलाईन व ऑफलाईन) पद्धतीने जानेवारी २०२२ मध्ये घेणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु विद्यापीठाने शासन व प्रशासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचा विचार करून ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२१ सर्व वर्षांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाने यापूर्वी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय २९ नोव्हेंबर रोजी घेतला होता. चार दिवसांतच सर्वच परीक्षा या ऑनलाईन घेण्याचा निर्णय सुधारीत परिपत्रक काढून घेतला आहे. हे परिपत्रक विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना पाठविले आहे.
----------
नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी..
सार्वजनिक ठिकाणी जाताना लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा ७२ तासांचे वैध आरटी पीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र जवळ असणे बंधनकारक आहे. अनेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसून अनेकांना फक्त पहिला डोसच मिळाला आहे. परीक्षा देताना शासन व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे.
-----------