मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर उघडले; भविकांवर पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 09:33 AM2021-10-07T09:33:15+5:302021-10-07T09:33:48+5:30
विठोबाचे दर्शन घेऊन भाविकांचे आनंद अश्रु अनावर....
पंढरपूर : मागील दीडवर्षांपासून कोरानाने थैमान घातला आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्यात आले. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होताच पुन्हा मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दीड वर्षानंतर विठोबाचे सावळे रूप भाविकांना पाहता आल्याने भाविकांचे आनंदाश्रू अनावर झाले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गुरुवारी भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. विठुरायाचे दर्शन मिळणार असल्याने भाविकींनी सकाळ पासून मंदिर परिसरात गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे देवाला नित्य पूजा करण्यात आल्या. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मंदिर समितीच्या वतीने विविध उपाय योजना सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये भाविकाचे दर्शन रांग सुरू होणार कासार घाटावर मंदिर समितीचे कर्मचारी उभे आहेत. त्याच ठिकाणी भाविकांकडून हार-फुले काढून घेतली जात आहेत. त्याचबरोबर भाविकांच्या हातावर सॅनिटायझर व शरीरातील तापमान तपासण्याचे काम होत आहे. विशिष्ट अंतराने प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेत सोडण्यात येत आहे.
विठोबाच्या दर्शनासाठी आलेल्या पहिल्या दहा भाविकांचे पुष्पवृष्टी करून मंदिर समितीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवारड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
भाजपच्यावतीने आनंदोत्सव साजरा; प्रसाद वाटप
श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे यासाठी भाजपच्या वतीने वारंवार आंदोलन करण्यात आले होते. यामुळे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर खुले होताच भाजपच्या जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी वारकऱ्यांसह मंदिराच्या नामदेव पायरीजवळ आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फुल देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर भाविकांना प्रसाद देखील वाट आला. यावेळी भाजपाचे लक्ष्मण धनवडे, चांगदेव कांबळे, प्रणव परिचारक, सोमनाथ आवताडे, विक्रम शिरसठ, शशिकांत चव्हाण, सुरेश आंबुरे, धीरज म्हमाने, ॲड. धनश्री खटके, माया माने, अर्पणा तारके उपस्थित होत्या.