मोठी बातमी; खबर मिळताच टीम धडकली गावात अन् वाचविलं दोन मुलींचा बालविवाह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 09:30 AM2021-07-08T09:30:20+5:302021-07-08T09:30:48+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथे होणारे दोन बालविवाह बालकल्याण विभागाच्या बालविवाह पथकाने आज गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास रोखले.
चडचण (राज्य - कर्नाटक) येथील एका १७ वर्षीय बालिकेचा विवाह गुप्त पद्धतीने पहाटे ५ वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन १०९८ द्वारे जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळाली.
गोपनीय माहितीच्या आधारे मंद्रुप ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पोलीस नाईक प्रदीप बनसोडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल आर. एस. शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, आर. यू. लोंढे यांचे पथक पहाटे ४.३० वाजता होनमुर्गीच्या दिशेने रवाना झाले. विवाहस्थळी तत्परतेने पोहोचून होत असलेला बालविवाह रोखण्यात पथकास यश आले.
हे पथक विवाहस्थळी पोहोचले असता १७ वर्षीय बालिकेचा विवाह होत असतानाच तिच्याच १६ वर्षीय चुलत बहिणीचाही बालविवाह होत असल्याचे चौकशीअंति पथकास निदर्शनास आले. बालिकांचा विवाह त्यांच्या नात्यातील युवकांशी होणार होता. हा बालविवाह बालविवाह प्रतिबंधक पथकाने थांबवून दोन बालिकांना बाल कल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर हजर केले असता बालकल्याण समितीने बालिकांची बालगृहात रवानगी केली.
हा बालविवाह रोखण्याबाबतची यशस्वी कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.