मोठी बातमी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामास सप्टेंबरपासून होणार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:51 PM2021-07-31T18:51:59+5:302021-07-31T18:52:05+5:30
कुलगुरू : सुशोभीकरणाचे कामही होणार
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक होणार आहे. स्मारक तयार करण्यासाठीचे टेंडर निघाले असून प्रत्यक्ष कामास सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
स्मारकामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा असणार आहे. यासाठीचे मॉडेल तयार करुन पुतळा तयार करण्यात येईल. कोरोनामुळे कोणती अडचण न आल्यास सहा महिन्यात काम पूर्ण होईल. पुतळ्यासोबतच परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा विद्यापीठाने तयार केला आहे. त्याचा खर्च हा सात कोटी इतका असणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन कोटी मिळणार असून त्यात पुतळा बसविण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात मिळणाऱ्या अनुदानातून परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. यात अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, काम, समाजसेवा याविषयी माहिती असणार आहे.
---------------
परीक्षा नियंत्रक, कुलसचिव पद भरतीस प्रक्रिया सुरू
विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक आणि कुलसचिव ही दोन्ही पदे प्रभारी आहेत. राज्याच्या १२ विद्यापीठांसाठी पत्रक काढले आहे. त्यानुसार शासनाने ही रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच ही पदे भरण्यात येणार आहेत. राज्यपाल नियुक्त समिती मुलाखत घेण्यासाठी गठित करण्यात आली आहे.
--------
पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटी विचार
बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाकडे विचारणा केली आहे. अकरावी प्रवेशाच्या धर्तीवर बारावीनंतर प्रवेशासाठी सीईटी करावी लागेल. शासनाकडून आदेशानंतर प्रश्न तयार करणे, परीक्षा घेणे हे करता येईल. विद्यार्थी जास्त संख्येने उत्तीर्ण झाल्यास त्या सर्वांनाच प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न असणार आहे. शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपासाठी भरती करावी लागेल. काही जागा वाढवाव्या लागतील. दोन सत्रात महाविद्यालये सुरू करता येतील. ऑनलाईन क्लास चालले तर ठीक पण ऑफलाईन झाल्यास अधिक अडचणी येतील. या विषयी फक्त विचार सुरू असून शासनाच्या निर्णयानंतर हे स्पष्ट होईल.
--------
खेलो इंडिया अंतर्गत साडेचार कोटी मंजूर
केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत विद्यापीठाला साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विद्यापीठात दोन हँडबॉल मैदाने, प्रशस्त सभागृह होणार आहे. राज्यातील फक्त सोलापूर विद्यापीठानेच यासाठी अर्ज केला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे.
----------------
महाविद्यालयांचे मूल्यांकन
विद्यापीठातर्फे महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सध्या मूल्यांकन होत नसले तरी येत्या काळात ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच सरकारच्या शिक्षण धोरण अंतर्गत मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीचे उद्दिष्ट ठेवून संशोधनावर भर देण्यात येणार आहे.