सोलापूर : काँग्रेस व सेनेची मते फोडून झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर यश मिळविणाºया भाजपला विषय समिती सभापती निवडीत स्वत:ची दोन मते फुटल्याने तीन समित्या गमवाव्या लागल्या. महाविकास आघाडीने तीन तर भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीने केवळ एका जागेवर यश मिळविले आहे. या निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव व झेडपीचे माजी अध्यक्ष, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे पुतणे रणजित शिंदे यांचा पराभव झाला.
झेडपीच्या चार विषय समिती सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. समाजकल्याण समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संगीता धांडोरे व समविचारी आघाडीचे सुभाष माने यांना समान मते पडली. त्यामुळे इतर तीन सभापतींची निवड घेतल्यानंतर अर्पिता तावस्कर या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. यात संगीता धांडोरे यांचे नाव निघाले. त्यानंतर महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्वाती शटगार ३५ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांच्या विरोधातील समविचारी आघाडीच्या संगीता मोटे यांना केवळ ३१ मते पडली. त्यानंतर विषय समिती सभापतीमध्ये विजयराज डोंगरे यांना ३४ तर विरोधी उमेदवार महाविकास आघाडीचे रणजित शिंदे यांना ३२ मते पडली. तसेच महाविकास आघाडीचे अनिल मोटे यांना ३४ तर समविचारी आघाडीचे अतुल पवार यांना ३२ मते पडली. डोंगरे व मोटे यांचा दोन मतांनी विजय झाला.
सकाळी १० ते १२ या वेळेत उमेदवारी दाखल करण्याची मुदत होती. यात भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीतर्फे समाजकल्याण समिती सभापतीसाठी सुभाष माने, महिला व बालकल्याणसाठी संगीता मोटे व इतर समितीसाठी विजयराज डोंगरे, अतुल पवार यांनी तर महाविकास आघाडीतर्फे अनुक्रमे संगीता धांडोरे, स्वाती शटगार, रणजित शिंदे व अनिल मोटे यांनी अर्ज दाखल केला. सभापतीपदासाठी दोन्ही गटांमध्ये चुरस होती. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नितीन नकाते संतापून उमेदवारी दाखल करण्यासाठी आले पण वेळ संपल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगताच त्यांचा नाईलाज झाला. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या संध्या गायकवाड यांनाही समाजकल्याण समिती हवी होती. पण उमेदवारी न मिळाल्याने त्याही नाराज झाल्या. दुपारी दोन वाजता निवडणुकीची वेळ होती. गायकवाड या सभागृहात आल्यावर पाठोपाठ समर्थकही आत आले. त्यांनी गायकवाड यांना माघारी नेण्याचा प्रयत्न केला, पण उमेश पाटील, बळीराम साठे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
इकडे नकाते भाजपच्या गोटात जाऊन बसल्याने रणजित शिंदे व बाळराजे पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी सदस्यांबरोबर शिवानंद पाटील, मल्लिकार्जुन पाटील, शीलवंती भासगी दाखल झाले. त्यानंतर उशिरा आलेल्या शैला गोडसे याही राष्ट्रवादी सदस्यांबरोबर बसल्या. छाननी झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी न्यायालयाच्या आदेशान्वये गोपाळपूर गटाचे सदस्य गोपाळ अंकुशराव यांना मतदानासाठी सभागृहात बसण्याची अनुमती असल्याचे सांगितले. पोलीस बंदोबस्तात अंकुशराव यांना सभागृहात आणण्यात आले. लागलीच उमेश पाटील यांनी अंकुशराव यांना हात धरून बाहेर नेले. हे पाहून पाठोपाठ सुभाष माने गेले. चर्चा करून पाटील यांनी पुन्हा आत आणून आपल्याजवळ बसवून घेतले. इकडे शिवसेनेचे अमर पाटील समविचारी आघाडीच्या सदस्यांमध्ये जाऊन बसले. त्यामुळे लागलीच भारत शिंदे यांनी त्यांना कोणाचा तरी फोन जोडून दिला. पण ते आपल्या जागेवरून हलले नाहीत, तर भाजपच्या टाकळी (पंढरपूर) गटाच्या रुक्मिणी ढोणे या मतदानाला गैरहजर राहिल्या. ६६ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला.
निवडीनंतर अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांनी विषय समितीचे वाटप जाहीर केले. यात उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याकडे शिक्षण व आरोग्य. डोंगरे यांच्याकडे पुन्हा अर्थ व बांधकाम तर मोटे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खाते देण्यात आले आहे.
अशी मिळाली मते...
- समाजकल्याण
- संगीता धांडोरे (शेकाप) : ३३
- सुभाष माने (अपक्ष) : ३३
- महिला व बालकल्याण
- स्वाती शटगार (काँग्रेस): ३५
- संगीता मोटे (भाजप): ३१
- अर्थ व बांधकाम
- विजयराज डोंगरे (भीमा आघाडी): ३४
- रणजित शिंदे (राष्ट्रवादी) : ३२
- कृषी व पशुसंर्वधन
- अनिल मोटे (सांगोला आघाडी) : ३४
- अतुल पवार (महायुती) : ३२
माने-धांडोरे यांना समान मतेपहिल्यांदा समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. सुभाष माने व संगीता धांडोरे यांना समान ३३ मते पडली. यात काँग्रेसच्या रेखा गायकवाड, शिवानंद पाटील यांनी समविचारीच्या बाजूने कौल दिला. समान मते पडल्याने अर्पिता तावस्कर हिच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यात धांडोरे यांना लॉटरी लागली. समाजकल्याण व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीनंतर इतर दोन सभापतींच्या निवडी सलगपणे घेण्यात आल्या. त्यामुळे अर्ज भरल्याप्रमाणे पाठोपाठ उमेदवारांची नावे आल्याने सदस्यांचा गोंधळ उडाला. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन पाटील यांनी पहिल्यांदा डोंगरे यांना मतदान केले. दुसºया वेळेसही त्यांनी हात वर केल्याने मतदान विरोधात गेले.
व्हिडिओ पाहून मतावर निर्णय- महिला बालकल्याण समिती सभापतीच्या मतदानावेळेस रेखा गायकवाड यांनी काही वेळ हात उंच केला नाही. मोजणी संपताना त्यांनी हात वर केला. याला भाजपचे आनंद तानवडे, शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी आक्षेप घेतला. दबाव टाकण्यात येत आहे, असा त्यांनी आरोप केल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी व्हिडिओ पाहून निर्णय घेतो, असे जाहीर केले. दहा मिनिटात त्यांनी तीन कॅमेºयातील व्हिडिओ चित्रीकरण पाहून गायकवाड यांनी हात वर करून मतदान केल्याचा निर्णय दिला.
धांडोरे, शटगार, डोंगरे, मोटे सभापती- झेडपीच्या चार विषय समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संगीता धांडोरे यांची समाजकल्याण समिती सभापती, स्वाती शटगार यांची महिला व बालकल्याण सभापती म्हणून तर अनिल मोटे यांची पशुसंवर्धन सभापती म्हणून निवड झाली तर समविचारी आघाडीचे विजयराज डोंगरे यांची दुसºयांदा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती म्हणून निवड झाली. धांडोरे या शेकापतर्फे कडलास (सांगोला) येथून तर शटगार या काँग्रेसतर्फे सलगर (अक्कलकोट) गटातून आणि मोटे हे घेरडी (सांगोला) गटातून राष्ट्रवादी आघाडीतर्फे निवडून आले आहेत. दुसºयांदा सभापती झालेले डोंगरे हे आष्टी (मोहोळ) गटातून भीमा आघाडीतर्फे निवडून आले असून, भाजपसोबत त्यांनी आघाडी केली आहे.