भाजप आमदारांचा उपोषणाचा इशारा; सोलापूरला मिळाले १८९० रेमडेसीवीर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 01:31 PM2021-05-12T13:31:17+5:302021-05-12T13:31:22+5:30
सोलापूर : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार व खासदारांनी उपोषणाचा इशारा देताच सोलापूरला मंगळवारी तब्बल ...
सोलापूर : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार व खासदारांनी उपोषणाचा इशारा देताच सोलापूरला मंगळवारी तब्बल १८९० रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे.
शहर व जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यातील गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत आहे. मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा खूपच कमी आहे.
पुणे विभागाला इंजेक्शनचा पुरेसा साठा मिळूनही सोलापूरवर अन्याय केला जात होता. अगोदरच बेड, वेंटीलेटर आणि ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड होत होती. अशातच रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. सोलापूरला उपलब्ध झालेला इंजेक्शनचा कोटा पुण्याला पळविला जात असल्याचा आरोप करून भाजप आमदारांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली होती. त्याचबरोबर येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत राज्य शासनाने पहिल्यांदाच सोलापूरला मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत.
आता मिळणाऱ्या या इंजेक्शनमधून सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांसाठी ७७५, बार्शी व उत्तर तालुक्यासाठी २७३, अक्कलकोट व दक्षिण सोलापूरसाठी ५३, मोहोळ आणि पंढरपूरसाठी ३२१, सांगोला, मंगळवेढ यासाठी १३६, माळशिरस १९८, माढा व करमाळा तालुक्यासाठी १३४ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे.