भाजप सत्तेसाठी काहीही करेल - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:11 PM2018-05-21T13:11:18+5:302018-05-21T13:11:18+5:30
मनमोहनसिंगच करू शकतात मोदींचा मुकाबला !
पंढरपूर : भारतात दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगली घडवल्या जातील, युद्ध लादून सैनिकांना शहीद करण्याचे काम देखील होईल. यातून आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र भाजपा निर्माण करेल. कारण भाजपा सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
धनगर आरक्षणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळाव्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला फक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच करु शकतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आणखी राजकीय शिक्षणाची गरज आहे. काँगे्रसला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर लहान पक्षांना एकत्र घ्यावे लागेल; मात्र त्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकात बोध घेतल्याचे दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष बदलत नसेल तर, तिसरा पर्याय निर्माण होईल. कर्नाटक येथील काँग्रेस व जेडीएस यांचे सरकार स्थिर नाही.
पुढील तीन महिन्यामध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. घटनेत तरतूद असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नसून त्यांना आरक्षण मिळावे. यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आंबेडकर म्हणाले. यापुढे अल्लुतेदार व बल्लुतेदारांना बरोबर घेऊन सत्ता संपादन करणार आहे व सत्तांतरानंतर बारा बलुतेरांचे प्रश्न सोडवित असताना, बहुजन समाजाला सोबत घेणार असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
संविधान बदलण्याचा शेवटचा मोका
भाजपाला संविधान बदलायचे आहे. त्यामुळे ते सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असल्याचे कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर दिसले आहे. २०१९ च्या निवडणुका हा भाजपासाठी संविधान बदलण्याचा शेवटचा मोका आहे. यामुळे २०१९ पूर्वी अनेक प्रकार दिसून येतील असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले; मात्र त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ न देण्यासाठी समविचारी पक्षाने देश पातळीवर एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.