सोलापूर - अकलूज पोलीसांनी रेमडेसिविरचा इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत आण्णासाहेब सुग्रीव किर्दकर (वय २८ वर्षे रा चाकाटी लाखेवाडी ता. इंदापूर जि. पुणे)] अजय महादेव जाधव (वय २३ वर्षे), कुमार महादेव जाधव (वय २१ वर्षे दोघे रा. संग्रामनगर ता. माळशिरस) यांनी आपसात संगणमत करुन कोविड-१९ या साथीच्या आजाराचे औषध म्हणून वापरण्यात येणारे रेमडेसिविरचा इंजेक्शनचा हे बेकायदेशीररित्या अवैध मार्गाने मिळवून स्वत:चे अर्थिक फायदयाकरिता कोणताही परवाना नसताना छापील किंमतीपैक्षा ३५ हजार रुपये अधिक दराने तसेच वैद्यकीय अधिका-याच्या चिट्ठीशिवाय व विना कोविड तपासणी अहवालाशिवाय अधिक किंमतीने विक्री करण्याकरिता बेकायदेशीररित्या आपल्या कब्जात बाळगून १०० फुटी बायपास रोडवरील अभय क्लिनीकजवळ अकजूज येथे विक्री करुन शासनाची फसवणुक करीत असताना आढळून आले. औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी दिलेले फिर्यादीवरुन अकलुज पोलीस ठाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.