विजय विजापुरे
बºहाणपूर : लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांचे जगणे अवघड ठरवले असले तरी त्याखालील घटकातील लोकांची अवस्था खूपच दयनीय झाली. अक्कलकोट तालुक्यात तोळणूर गावातील एका अंध गायकाने चक्क स्वत:चे हार्मोनियम एका व्यक्तीकडे गहाण ठेवून उसने पैसे घेतले़ आजपर्यंत या कुटुंबाला जगवणारे हार्मोनियमच गहाण ठेवल्याने भटकंती करून जीवन व्यथित करण्यालाही खो बसला आहे.
राचय्या मुगळीमठ असे त्या दृष्टीहीन कलावंताचे नाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या सीमेवर वसलेले तोळणूर (ता.अक्कलकोट) हे गाव़ राचय्या यांनी संगीतातल्या विविध प्रकारच्या कला आत्मसात केल्या़ लॉकडाऊन काळात परिस्थिती बिकट झाल्याने आणि घसा खराब झाल्याने जगण्यासाठी स्वत:चा हार्मोनियम पाच हजार रुपयांना राचय्या यांनी एका व्यक्तीकडे गहाण ठेवला.
आई गिरमा व वडील रुद्रप्पा यांना तीन मुले व दोन मुली आहेत़ त्यापैकी राचय्या मुगळीमठ हा जन्मत: दोन्ही डोळ्याने अंध आहे; मात्र त्याच्या गायनाची दृष्टी ही तेजोमयच़ खूप गरीब परिस्थितीतून त्याने संगीताचा प्रवास चालू ठेवला़ पत्नी अपंग, वडील, भाऊ मतिमंद आहेत. या सर्वांसाठी केवळ आईच शारीरिकदृष्ट्या सक्षम ठरली़ गावात पीठ मागून, शेतकºयांच्या शेतात खुरपणी करून पतीसह मुलांना सांभाळते आहे़ राचय्या यांच्या संगीत साधनेमुळे, भजन, पुराण धार्मिक कार्यक्रमातील वाद्यसंगीताच्या सादरीकरणातून थोडी आर्थिक मदत होत होती. पण कोरोनामुळे सगळी मंदिरं बंद, धार्मिक कार्यक्रम बंद पडल्याने ती तुटपुंजी मदतही थांबली. अशातच घसा खराब होऊन आजारी पडले. बायको घरातून निघून गेली. जगायचे कसे ? हा प्रश्न त्याला सतावत होता. त्यात दवाखान्याला कोण नेणार याची चिंता भेडसावत होती.
राचय्या यांच्या घराचे होत असलेले हाल तोळणूरचे रहिवासी धानय्या कवटगीमठ व शरणू कोळी, बिरेश खोटी, सोमशेखर जमशेट्टी यांना कळाले. त्यांना राहावले नाही व ही पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली. पण त्यास फारशी मदत मिळू शकलेली नाही़या हार्मोनियमने त्यांच्या आवाजाची जादू गावभर पसरवली. या संगीतसेवेवरच त्यांची रोजीरोटी अवलंबून आहे. आता त्यांच्यावर कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
वयाच्या आठव्या वर्षापासून संगीत सेवा तीन वर्षांपूर्वी राचय्याला सोडून गेलेली अपंग पत्नी मुलासह तोळणूरला येऊन आता सेवा करू लागली. संगीत पुट्टराज गवई यांच्याकडून राचय्या याने संगीत शिक्षण घेऊन वयाच्या आठव्या वर्षांपासून हार्मोनियमसह विविध वाद्ये वाजवत संगीत सेवा केली़ पण आता घशाचा प्रश्न निर्माण झाला़ त्यामुळे बोलताही येत नाही़ ज्या हार्मोनियमने ४० वर्षे सहा जणांचे पोट भरवले अखेर तेच हार्मोनियम परिस्थितीमुळे गहाण ठेवावे लागले. ज्याच्याकडे हे हार्मोनियम गहाण ठेवले आहे त्यांच्याकडे जाऊन विनंती करून हार्मोनियम सोडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ सोशलमिडीयातून प्रयत्न झाले मात्र फारशी काही मदत मिळू शकली नाही. गावपातळीवरही मदत मिळवून देण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते झटत आहेत. मात्र या कोरोनामुळे अन्य हृदय पिळवटून टाकणाºया व्यथा निदर्शनास येऊ लागल्या आहेत.