पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बोट चालकांना प्रशिक्षण द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:41 AM2021-03-04T04:41:47+5:302021-03-04T04:41:47+5:30
विस्तीर्ण अशा जलाशयामुळे जलविहार करण्याची येथे मोठी संधी असून, पर्यटक या संधीचा लाभ घेतात. मात्र, गत काही वर्षांपासून पर्यटक ...
विस्तीर्ण अशा जलाशयामुळे जलविहार करण्याची येथे मोठी संधी असून, पर्यटक या संधीचा लाभ घेतात. मात्र, गत काही वर्षांपासून पर्यटक बोटीतून जलविहार करत असताना बोट उलटून जीवितहानीच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशीच एक ताजी घटना २८ फेब्रुवारी २०२१ रोजी करमाळा तालुक्यातील वांगी येथे उजनीच्या बॅकवाॅटरमधे घडली. नौकाविहार करत असताना नाविकाचे बोटीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे बोट उलटून अकलूज येथील पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उजनी जलाशयात नौकाविहार करताना वारंवार दुर्दैवी घटना घडत असल्यामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
शासनाने यावर उपाययोजना म्हणून नौकाविहारासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींचा सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करावा, बोटी चालविणाऱ्या नाविकांना प्रशिक्षणाची तरतूद शासनाकडून करावी. शासनाने शासकीय किंवा परवाना पद्धतीने बोटिंग व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांना लाइफ जाकिटाची सुविधा उपलब्ध करून शासनाकडून उजनी जलाशयात बोटिंगसाठी पर्यटनस्थळे निश्चित करावीत.
जलविहार करीत असताना जलाशयावर पक्ष्यांच्या विलोभनीय कवायतींचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. सध्या काही तरुण मंडळी व मच्छीमार पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद देत आहेत. त्याकडे रोजगार निर्मितीचे मोठे साधन म्हणून पाहणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटकांची जेवढी सुरक्षेची काळजी घेता येईल, तेवढी खबरदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.
तरच अपघात टाळता येतील
पर्यटनवाढीसाठी शासनस्तरावर पर्यटन विकास केंद्र, पक्षी निरीक्षण केंद्र, मत्स्य अभ्यास केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र व्हावे, पक्षी निरीक्षणासाठी ठिकठिकाणी टॉवरची निर्मिती, पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न व्हावे, दुर्दैवी घटना टाळण्यासाठी बॅकवॉटरमध्ये ठिकठिकाणी नौकाविहारासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाइफ जाकीट पुरवावे, शासकीय वा परवाना पद्धतीने प्रशिक्षित बोटिंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात पर्यटकांच्या बोटींच्या अपघात घटना टाळता येतील, आदी मागण्या पर्यटनमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.