करमाळा नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुका पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. सर्वांचे लक्ष असलेल्या बांधकाम समितीच्या सभापतिपदी नागरिक संघटनेच्या स्वाती महादेव फंड, शिक्षण समितीच्या सभापतिपदी जगताप गटाच्या सीमा रामदास कुंभार, आरोग्य समितीवर सभापतिपदी उपनगराध्यक्ष अहमद अंबीर कुरेशी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.
करमाळा नगर परिषदेत जगताप, सावंत व नागरिक संघटना यांच्या युतीची सत्ता आहे. बागल गट विरोधात आहे. नगरपालिकेत एकूण १७ नगरसेवक असून, जगताप गटाचे ४, सावंत गटाचे ३, नागरिक संघटनेचे २ व घुमरे गटाचा १ व बागल गटाचे ७ नगरसेवक असे बलाबल आहे. नगराध्यक्षपदी जगताप गटाचे वैभवराजे जगताप आहेत.
बागल गटाने आजच्या विषय समितीच्या निवडीवर बहिष्कार घातल्याने त्यांच्या गटाचा एकही नगरसेवक पालिकेकडे फिरकला नाही. गेल्या चार वर्षांपासून सत्तेतल्या सावंत गटाने मात्र त्यांना युतीतून देऊ केलेली पाणीपुरवठा समिती अचानकपणे नाकारली. यामुळे पालिकेत पाणीपुरवठा व पुरेशा सदस्य संख्येअभावी महिला बालकल्याण या दोन समितींच्या निवडी होऊ शकल्या नाहीत. स्थायी समितीच्या सभापतिपदी पदसिद्ध नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांची निवड करण्यात आली.
यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी वीणा पवार, जगताप गट, नागरिक संघटना व सावंत गटाचे सर्व नगरसेवक व विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. ---
थांबा आणि पहा..
करमाळा नगर परिषदेत आमच्या युतीची सत्ता आहे. विषय समितीच्या निवड कामकाजात आम्ही सहभाग घेतला, पण देऊ केलेली समिती नाकारली. या विषयी वेळ आल्यावर बोलेन. तूर्त थांबा आणि पहा, असे स्पष्टीकरण सावंत गटाचे गटनेते संजय सावंत यांनी दिले.
-----
विकासाचा अभाव...
शहरातील खराब रस्ते, मच्छीमार्केट बांधून तयार पण खुले केले जात नाही. नगर परिषदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम नाही. शहरातील अंडरग्राउंड गटारीचा प्रस्ताव धूळ खात पडून. त्याशिवाय श्रीकृष्णनगरमधील नियोजित मंगल कार्यालय कागदावर. या सर्व विकासकामाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आजच्या विषय समितीच्या निवडीवर आम्ही बहिष्कार घातल्याचे बागल गटाचे गटनेते शौकत नालबंद यांनी सांगितले.
----