Breaking; कुर्डूत होणारा बालविवाह रोखला; बालसंरक्षण पथकाची मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 03:56 PM2021-01-03T15:56:52+5:302021-01-03T15:57:35+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
कुर्डूवाडी : कुर्डू (ता.माढा येथील एका गल्लीत रविवारी मोठ्या थाटा-माठात १२:३० वाजता मंडप देऊन शाही विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते. वऱ्हाडी मंडळीही जमलेली होती, परंतु त्यातील वधू मुलीचे वय हे खूप लहान असल्याची गोपीनीय माहिती सोलापूर येथील बाल संरक्षण अधिकारी ताटे व माढा पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे यांना दूरध्वनीवरून मिळाली. लागलीच त्यांनी याबाबत गावचे ग्रामविकास अधिकारी विजय माढेकर यांना पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी विजय माढेकर, पोलीस हवालदार रंदिवे, पोलीस कर्मचारी आरकिले यांचे पथक लग्ना लागण्याच्या अगोदरच विवाहास्थळी पोहचले. लग्नाची सगळी तयारी सुरू झालेली होती, परंतू संबधित पथकाने त्यांच्यावर कारवाई करीत येथील बालविवाह रोखण्यात यश मिळविले.
यावेळी संबधीत पथकाने मुलीच्या वडिलांना वय कमी असल्याने लग्न करू नये अशा सूचना दिल्या. त्यावर हा साखरपुडा असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु संबधीत पथकाने आलेल्या वऱ्हाडाला याबाबत विचारले तर लग्न असल्याचे समजले. त्यामुळे बाल संरक्षण अधिकारी ताटे यांच्या सूचनेनुसार पथकाने अल्पवयीन मुलीला व वडीलाला जबाबासाठी यावेळी ताब्यात घेतले. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांत जबाब घेऊन पुढील कारवाईसाठी सोलापूर येथील बाल संरक्षण कार्यालयाकडे ताब्यात देण्यात आले.