Breaking; सोलापुरात 'कोरोना' संसर्ग आणणाऱ्याचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:43 AM2020-04-21T09:43:22+5:302020-04-21T09:47:35+5:30
पोलीस, आरोग्य खात्याची मोहीम: बाधितांकडून दिली गेली नाही खरी माहिती...!!
सोलापूर: सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग आणणाऱ्या प्रथम रुग्णाचा शोध सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी "लोकमत'शी बोलताना दिली.
सोलापुरात पाच्छा पेठेतील किराणा दुकानदारास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा दिसून आले. प्रयोगशाळेतील अहवाल येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची हिस्ट्री तपासल्यावर ते पहिल्यांदा ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले होते तेथील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रुग्णालयातील एक महिला कर्मचारी व किराणा दुकानदाराच्या घरातील सदस्य पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे विषाणूचे संक्रमण कोठून आले याचा शोध घेण्यात येत आहे. संबंधितांनी व्यवस्थित माहिती न दिल्याने शोध घेण्यात अडचण निर्माण झाली आहे, तरीही आरोग्य व पोलिस विभागातर्फे विषाणूचे मूळ संक्रमण लवकरच शोधले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केला.
पोलिसावर होईल कारवाई
होम क्वारंटाईन असताना ठाण्याचा एक पोलिस सोलापुरात आला, ठाण्याच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासणी केल्यावर तो पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. होम क्वारंटाईनचा नियम तोडून दुसऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण निर्माण केल्याप्रकरणी त्या पोलिसावर कारवाई होऊ शकते अशी माहिती एका पोलीस अधिकार्याने दिली.