सांगोला : अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला, त्याच गॅस कटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडून सुमारे ७ लाख रुपयांची रोकड लंपास केली.
चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता बँकेतील कागदपत्रे बाहेर आणून जाळून टाकली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास (शिवणे ता. सांगोला) येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत घडली. यापूर्वी अशाच प्रकारे या बँकेत चोरी करून चोरट्यांनी रोकड लंपास केली होती, त्या घटनेचा अद्याप तपास लागला नसताना पुन्हा बँकेत चोरी झाल्याने पोलिसांच्या कर्तव्या विषयी संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान बँकेतील चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. चोरट्यांच्या तपासासाठी सोलापूर येथून श्वानपथक मागवले आहे. सध्या पोलिस घटनास्थळी ठाण मांडून आहेत.