कुसळंब-येरमाळा राज्यमार्गावर पुलाची कामे संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:04+5:302021-07-10T04:16:04+5:30
कुसळंब : कुसळंब-येरमाळा राज्यमार्गावर पुलाची कामे संथ गतीने चालू आहेत. परिणामत: पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहनचालकांना जाणे जिकिरीचे झाले आहे. ...
कुसळंब : कुसळंब-येरमाळा राज्यमार्गावर पुलाची कामे संथ गतीने चालू आहेत. परिणामत: पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहनचालकांना जाणे जिकिरीचे झाले आहे. कुसळंब, पाथरी, पिंपळवाडीदरम्यान अतिक्रमणामुळे कामे संथ गतीने सुरू आहेत. या कामाला गती देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कुसळंब-येरमाळा राज्यमार्गावरील काम तीन वर्षांपासून चालू आहे. ऐन पावसाळ्यात पाथरी ओढ्यावर पुलाचे काम चालू केले आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी जवळच्या गावांचा संपर्क तुटतो. मात्र पूल व गटारीची कामे संथ गतीने सुरू आहेत. सध्या पावसाळा सुरू झाल्याने पाथरी गावाच्या दोन्ही बाजूंनी पुलाची कामे चालू आहेत. रस्त्यावर माती व मुरूम टाकल्याने पावसाळ्यात मोटारसायकलस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर ओढ्याला पाणी आले की नागरिकांची गैरसोय होते.
तसेच कुसळंब, धानोरे, पाथरी, पिंपळवाडी या तिन्ही गावांच्या गटारीची कामे रखडली आहेत. पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरते. या कामांना गती न दिल्यास बार्शी येरमाळा या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच शिवाजी खोडवे, उपसरपंच किशोर काशीद, काकासाहेब काशीद, अशोक झोंबाडे, विनोद पवार, वैभव पोटरे, शिवाजी शिंदे, शिवाजी शिंदे, पिंपळवाडी सरपंच जयश्री चौधरी, रमेश चौधरी, गोवर्धन चौधरी, परसराम पाटील, सुनील ओव्हाळ, पाथरी सरपंच नेताजी गायकवाड, उपसरपंच ब्रह्मचारी गायकवाड, नरसिंह गायकवाड, नानासाहेब गायकवाड, राजाभाऊ गायकवाड, रफिक शेख, सुधीर गायकवाड यांनी दिला आहे.
---
फोटो : ०९ कुसळंब
कुसळंब-येरमाळा राज्यमार्गावर पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होते.