सोलापूर महानगरपालिकेसाठी दोनशे कोटी आणा, अन्यथा लोकसभेला खरं नाही : भाजप नगरसेवकांचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:09 PM2018-12-29T12:09:03+5:302018-12-29T12:10:40+5:30
सोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे नगरसेवकांना शहर विकासासाठी निधी मिळत नाही. राज्य शासनाने खास बाब म्हणून ...
सोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे नगरसेवकांना शहर विकासासाठी निधी मिळत नाही. राज्य शासनाने खास बाब म्हणून महापालिकेला २०० कोटी द्यावेत, अशी मागणी महापालिकेचे सभागृहनेते संजय कोळी यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन पाठवून केली आहे.
हा निधी मिळाला नाही तर लोकसभेला जनतेचा रोष ओढावेल. आपलं काही खरं नाही, असा इशाराही दोन देशमुख आणि भाजपा शहराध्यक्षांना स्वतंत्रपणे दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
शहरातील विकासकामांसाठी मंजूर अंदाजपत्रकातील भांडवली निधी द्यावा, या मागणीसाठी भाजपा नगरसेवक आणि महापालिका आयुक्तांची गुुरुवारी समन्वय बैठक झाली. महापालिकेची आर्थिक नाजूक असल्याने यावर्षी भांडवली निधी मिळणार नाही. शासनाकडे पाठपुरावा करा आणि विशेष पॅकेज आणा, असा सल्लाही आयुक्तांनी दिला.
त्यानुसार आज सभागृहनेते संजय कोळी यांनी निवेदन तयार केले. त्यावर नगरसेवकांच्या सह्या घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. काही नगरसेवक या निवेदनावर सह्या करायला तयार नव्हते. महापालिकेचे उत्पन्न वाढविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आपण त्यांना मदत करु. पण आयुक्त सांगतात म्हणून आपण शासनाकडे जायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शहरातील मेजर व मिनी गाळ्यांचा प्रश्न सुटलेला नाही.
मोठे थकबाकीदार कर भरायला तयार नाहीत. जीएसटीचे अनुदान कमी मिळत आहे. यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही जीएसटी अनुदानातील थकबाकीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शहर विकासाला निधी मिळालेला नाही. आयुक्तांनी भांडवली निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाने खास बाब म्हणून २०० कोटी द्यावेत.
लोकांचा रोष वाढेल.. पक्षाला फटका बसेल
- नगरसेवकांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांना स्वतंत्र निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, दोन ते चार महिन्यांत लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होणार आहे. नगरसेवकांना निधी न मिळाल्याने शहरात मूलभूत विकास होत नाही. लोकांचा रोष वाढेल. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला त्याचा फटका बसेल. याचा गांभीर्याने विचार करुन आपण वरिष्ठ स्तरावर २०० कोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.