ए भाऽऽय, अरे कोई हैऽऽ...? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:51 PM2019-01-01T14:51:36+5:302019-01-01T14:52:03+5:30

परवा एकजण सांगत होता, दोघा जणांनी मिळून भररस्त्यात पोरीची जाम फजिती केली, पोरगी जाम ओरडत होती पण पोरांनी शेवटी ...

A brother, hey someone ...? | ए भाऽऽय, अरे कोई हैऽऽ...? 

ए भाऽऽय, अरे कोई हैऽऽ...? 

Next

परवा एकजण सांगत होता, दोघा जणांनी मिळून भररस्त्यात पोरीची जाम फजिती केली, पोरगी जाम ओरडत होती पण पोरांनी शेवटी तिला गाडीवर बसवून नेलं पळवून!  एखाद्या थरार चित्रपटातलं दृश्य सांगावं असं तो सांगत होता. महाविद्यालयात शिकणाच्या (?) टवाळ पोरांचा हा प्रताप काळिमा फासणारा होता पण निर्ढावलेपणे करीत भर रस्त्यावर ही घटना घडली तरी कशी?

कोणीच नव्हते का या रस्त्यावर? एवढे सगळे घडत असताना तू मदतीला का धावला नाहीस? असं मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, किती गर्दी झाली होती माणसांची.., शिवाय कॉलेजचे सर पण होते की तिथं. कुणीच मध्ये पडलं नाही मग मी कशाला कुणाच्या भानगडीत पडू? गर्दी नक्की असेल पण या गर्दीत असलेली माणसं नक्की माणसं असतील? त्या मुलीच्या जागी यांचीच मुलगी असती तर हे असेच बघे बनून पाहात राहिले असते ?? घटनेचे सिनेस्टाईल वर्णन करून सांगणाºयाच्याच मुलीवर अशी वेळ आली असती तर त्याने असंच सांगितलं असतं ?

सोशल मीडियावर एक ध्वनीचित्रफित पाहायला मिळाली. एक तरुण मुलगी आत्महत्या करतेय अन् बघ्यांची मोठी गर्दी जमलीय. कुणी बघत राहिलं होतं तर कुणी आपल्या मोबाईलवर त्याचे चित्रण करण्यात दंग होतं. आत्महत्या होईपर्यंतचे चित्रण करण्यात त्यांनी मानली धन्यता पण एक जीव वाचविण्यासाठी कुणाचेच हात पुढे गेले नाहीत की जागचे पाय हलले नाहीत. तो बँकेच्या पायरीवरच बसला. छातीला हात लावून कळवळत होता, मदतीची याचना करीत होता. माणसं त्याच्या आजूबाजूने पुढे निघून जात होती. काही वेळेतच त्याचा तिथंच मृत्यू झाला.

माणसांच्या एवढ्या गर्दीत एखादा माणूस भेटला असता तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता. पण माणूसपण जपायला हल्ली वेळ नाही हो कुणाकडे! मोबाईल काढून चित्रीकरण करायला अन् ते मोठ्या कौतुकानं सोशल मीडियावर टाकायला मात्र वेळच वेळ आहे या दुनियादारीत! रस्त्यावरच्या अपघातांचीही कितीतरी दृश्यं पाहतोच की आपण. रक्ताच्या थारोळ्यात तडफडणारे जीव आणि आजूबाजूला त्यांचे चित्रण करणारे हात. हे हात मदतीसाठी नाहीत पुढे येत. आपल्याच घरातलं कुणी असते तर यांनी असंच चित्रण करण्यात धन्यता मानली असती? अलीकडेच मुंबईच्या रस्त्यावर असाच जीव जाताना त्याचे चित्रीकरण करण्यात आनंद मानणारी माणसं (!) दुनियेनं पाहिली.

हृदयविकाराचा झटका आलेल्या नांदेडच्या युसूफला भररस्तात स्टेचरवर ठेवलं होतं. तातडीनं दवाखान्यात नेण्यासाठी टॅक्सीचालकांना विनवलं जात होतं. रुग्णालयही अगदी जवळच होतं, पण जवळचं भाडं परवडत नाही म्हणून टॅक्सीचालक तयार नव्हते. अनेक टॅक्सी उभ्या होत्या पण पोलिसांनाही त्यांनी जुमानलं नाही. अखेर युसूफसोबत माणुसकीचाही बळी गेला. त्याचा व्हिडिओ मात्र अनेकांनी काढला अन् सोशल मीडियावर सगळ्यांनीच पाहिला. रोजच होतोय हो माणुसकीवर बलात्कार! काहीही वाटत नाही कुणाला! निर्ढावलेलं काळीज अन् मेलेली मनं!

बीड इथे नुकतीच घडलेली घटना काय सांगते ? परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या सुमीत वाघमारे याच्यावर गजबजलेल्या रस्त्यावर हल्ला झाला. श्रीमंत मुलीवर प्रेम करून लग्न केलं होतं सुमितनं.सुमित अन् भाग्यश्री यांची जातही एकच, पण भेद होता गरीब श्रीमंतीचा. भाग्यश्रीच्या भावानेच आपल्या बहिणीचं कुंकू रक्तानं लाल केलं होतं. गर्दीतल्या रस्त्यावर असंख्य डोळ्यासमोर सुमितवर शस्त्रांचे वार होत राहिले. गर्दीनं त्याचे चित्रीकरण केलं. हल्लेखोर पळून गेले पण गर्दीचे हात मदतीसाठी पुढे नाही आले. भाग्यश्री टाहो फोडून या गर्दीकडे मदतीची याचना करीत राहिली. ‘वाचवा हो..ऽऽ, वाचवा ना कुणीतरी..ऽऽ उचला रे कुणीतरी असा आक्रोश भाग्यश्री करीत राहिली पण गर्दीतल्या एकाचंही मन पाझरलं नाही की कुणाचाही ‘माणूस’ जागा झाला नाही. भाग्यश्री हंबरडा फोडत होती, ‘माझ्या नवºयानं किती जणांना दवाखान्यात नेलंय, आज त्याला कुणीतरी वाचवा रेऽ आजूबाजूचे सगळेच ओळखीचे, कधी ना कधी सुमितची मदत घेतलेले. आज सगळे बघे झाले होते.

अनेकजण केवळ आपल्या मोबाईलमध्ये हे सगळं चित्रित करीत राहिले, फोटो काढत राहिले, पण या गर्दीत माणूस हरवलेला होता. मानवता मात्र रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली होती. व्वा रे दुनियादारी! अरे कुठे हरवलंय सगळेच माणूसपण? मशाल चित्रपटातील दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेलं दृश्य रोजच अवतीभवती पाहायला मिळतंय. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पत्नीला वाचविण्यासाठीचा आक्रोश, ए भाय, कोई हैऽऽ? कोई तो दरवाजा खोलोऽ.कोई तो गाडी रोक लोऽ! ना कुणाच्या घरांचे दरवाजे उघडतात ़ ना कुणाच्या मनाचे! आजही रस्त्यारस्त्यावर ऐकायला मिळतंय, ए ऽऽ भाय. अरे कोई हैऽऽऽ? 
- अशोक गोडगे (कदम)
(लेखक हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत)

Web Title: A brother, hey someone ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.