बैलं मिळत नाहीत ट्रॅक्टरमागे धावाधाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:16 AM2021-06-18T04:16:08+5:302021-06-18T04:16:08+5:30
मोहोळ : शहरासह तालुक्यात चालूवर्षी १ जूनपासूनच पावसाने कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र हजेरी लावली. बळीराजा सुखावला असून, यंदाचे खरीप पदरात ...
मोहोळ : शहरासह तालुक्यात चालूवर्षी १ जूनपासूनच पावसाने कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र हजेरी लावली. बळीराजा सुखावला असून, यंदाचे खरीप पदरात पडावे यासाठी शेतकरी मशागतीत गुंतला आहे. पशुधन कमी झाल्यामुळे बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या मागे धावाधाव करुन पेरणी करु लागले आहेत. मात्र चांगल्या उत्पादनासाठी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
तालुक्याची पावसाची सरासरी ४७७ इतकी आहे. २०१८ मध्ये केवळ ३९.७६ टक्के पाऊस झाला. २०१९ मध्ये ४४४.५५ इतका, तर मागील वर्षी २०२० मध्ये ५८६.२३ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. यावर्षी १७ जूनअखेर सरासरी ४८.८८ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. चालूवर्षी १५ दिवसातच मोहोळ मंडलात १४८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वाघोली मंडल २८ मि.मी., कामती मंडल ३९ मि.मी., टाकळी मंडल ८.७४ मि.मी., सावळेश्वर ५२ मि.मी., नरखेड २२ मि.मी., शेटफळ ५७ मि.मी. व पेनूर ३६.०१ मि.मी. असा ३७० मिलिमीटर सरासरी ४८.८८ इतका पाऊस पडला आहे.
त्यामुळे तालुक्यातील बळीराजा आता खरीप पेरणीच्या तयारीत मग्न आहे. यंदा मोहोळ तालुक्यात एकूण १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन आहे. त्यात प्रामुख्याने मका ५६५० हेक्टर, तूर ३२५० हेक्टर, सोयाबीन २२०० हेक्टर, उडीद ८०० हेक्टर या पिकांचा समावेश आहे.
२१ जून ते १ जुलै या काळात कृषी संजीवनी मोहीम तालुक्यात राबवित आहे. त्यात कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील शास्त्रज्ञ तसेच अधिक उत्पादन घेणारे शेतकरी यांचेही मार्गदर्शन शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
---
खते व बियाणांची विक्री चढ्या दराने करू नका, अशा सूचना सर्व कृषी सेवा केंद्रांना दिल्या आहेत. चढ्या दराने खते विक्री होताना आढळल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- अतुल पवार, तालुका कृषी अधिकारी, मोहोळ
---
बैलजोडीने जशी मशागत होते, तशी ट्रॅक्टर लावून होत नाही. त्यात पशुधन कमी असल्याने बैल मिळत नाहीत. मिळाले तर ते परवडत नाहीत. नांगरणीचा एकरी दोन हजार रुपये दर झाला आहे. घास गवत करण्यासाठी स्वतःच सरी खोदण्याचे काम चालू आहे. मेहनतही होते आणि पैसेही वाचतात.
- कास वाघमोडे, शेतकरी, कोळेगाव
----
असं आहे भौगोलिक क्षेत्र...
मोहोळ तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ५६ हजार ४०० हेक्टर असून लागवडीलायक क्षेत्र १ लाख २४ हजार ७७५ इतके आहे. खरिपाचे एकूण ५४५६ हेक्टर इतके क्षेत्र आहे. रब्बीसाठी ८२ हजार २९० इतके क्षेत्र आहे.
----
फोटो : १७ मोहोळ
घास गवत करण्यासाठी बळीराजा स्वतःच सरी खोदण्याचे काम करत आहे.