शेतात पाण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यावर तुटून पडली मोकाट कुत्री; सैफुल परिसरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 02:40 PM2019-02-08T14:40:36+5:302019-02-08T14:42:22+5:30
सोलापूर : सैफुल परिसरातील रेणुका नगराजवळील आजोबासमवेत शेतात गेलेल्या चार वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ...
सोलापूर : सैफुल परिसरातील रेणुका नगराजवळील आजोबासमवेत शेतात गेलेल्या चार वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले.
ओमप्रकाश चुंगी (वय-४, रा. रेणुकानगर) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. ओमप्रकाश चुंगी हा गणेश नाईक बालक मंदिर, प्राथमिक शाळेच्या बालवाडीमध्ये शिकतो. बुधवारी बालवाडीला सुट्टी देण्यात आली होती. आईवडील दोघेही कामाला असल्याने ओमप्रकाश याला रेणुकानगर येथे असलेल्या शेतात काम करणाºया आजी-आजोबांकडे सोडण्यात आले होते. आजोबा पाणी आणण्यासाठी शेतातील हौदाकडे जात होते. पाठोपाठ ओमप्रकाशही गेला. हौदात पाणी नसल्याने आजोबा यांनी जवळच असलेल्या विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. आजोबा ओमप्रकाशला हौदाजवळ थांबवून विहिरीत उतरले.
अचानक पाच मोकाट कुत्रे पाण्याच्या हौदाजवळ आले, त्यांनी ओमप्रकाशवर हल्ला करून चावा घेण्यास सुरूवात केली. ओमप्रकाश मोठ्याने ओरडू लागला, हा आवाज ऐकून परिसरातील लोक हौदाच्या दिशेने धावले. तेव्हा मोकाट कुत्रे ओमप्रकाशचे लचके तोडत होते. लोकांनी कुत्र्यांना काठीने मारण्यास सुरूवात केली मात्र ते ओमप्रकाशला सोडत नव्हते.
उलट कुत्र्यांनी जंगलातील हिंस्त्रप्राण्यांप्रमाणे फरफटत नेण्यास सुरूवात केली. तेव्हा लोकांनी कुत्र्याला काठीने जोरात मारण्यास सुरूवात केल्यानंतर ओमप्रकाशला सोडून पळून गेले. शेताचे मालक मनपा परिवहन समिती सदस्य नितीन भोपळे यांनी तत्काळ ओमप्रकाश याला शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.
आईने फोडला हंबरडा...
- ओमप्रकाश याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन तेथे आई-वडिलांनी मुलाची अवस्था पाहून हंबरडा फोडला. ओमप्रकाशचे रक्ताने भरलेले कपडे आणि जमिनीवर कुत्र्यांनी लोळवल्याने झालेली अवस्था पाहून उपस्थितही हेलावून गेले.