गेल्या पाच-सहा वर्षांपासून तालुक्यात वाळू माफियांनी दिवसरात्र वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला होता. माण, कोरडा, अफ्रुका, बेलवण नदीलगतच्या शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत होता. दरम्यान २०१६ पासून आजपर्यंत महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत सदरची वाहने जप्त केली आहेत. या कारवाईनंतर अनेकांनी दंड भरून आपली वाहने सोडवून घेतली. मात्र अद्यापही १८२ जणांनी दंड भरण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
दरम्यान विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या १८२ जणांकडे अद्यापही दंडाची ३ कोटी ४० लाख ५२ हजार ४०९ रुपये प्रलंबित आहेत. पाच वर्षांनंतरही दंड भरण्यासाठी संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने तहसीलदार अभिजित पाटील यांनी महसूलचा दंड न भरणाऱ्या १८२ जणांच्या जंगम मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश दिले आहेत.
पळवून नेणारी वाहने रोखण्यासाठी उपाय
२०१६ पासून विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ती वाहने शासकीय गोडाऊन व सांगोला बस स्थानकाच्या आवारात सडत पडली होती. वाहन मालकांकडून शासकीय गोडवान परिसरातून तसेच बसस्थानकाचे सुरक्षा गेट तोडून वाहने पळवून नेण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. यावर उपाय काढण्यासाठी शासकीय गोडाऊनला संरक्षक भिंत बांधून त्या ठिकाणी वाळू चोरीतील वाहने लावण्यात येणार असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.
कोट -
सांगोला तालुक्यातील नद्या ओढ्यातून चोरट्या वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी महसूल विभागाबरोबरच पोलीस अधिकारी-कर्मचारी कारवाई करीत आहेत ही बाब समाधानकारक आहे. तरीही मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्यासाठी महसूलची दोन पथके तैनात केली आहेत. वाळू चोरी करून वाहन मिळून आल्यास अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- अभिजित पाटील ,तहसीलदार सांगोला