धंदेवाईक नेत्याने निष्ठा शिकवू नये, तानाजी सावंत शिवसेनेतच राहतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:19 PM2020-01-10T15:19:02+5:302020-01-10T15:21:43+5:30
शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले यांची टिका; बरडे, डिकोळे यांच्या टीकेनंतर प्रत्युत्तर
सोलापूर : शिवसेनेत ३३ वर्षे राहून काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्याच्या घरात कायम पाणी भरणाºया धंदेवाईक नेत्यांची तानाजी सावंत यांच्याबद्दल बोलायची पात्रता नाही, अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी केली. तानाजी सावंत यांचा शिवसेना पक्षप्रमुखांवर विश्वास आहे. लवकरच याचा उलगडा होईल, असे स्षष्टीकरणही त्यांनी दिले.
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी पक्षाचा आदेश डावलून भाजपला मदत केली. त्यावरुन सेनेते वातावरण तापले आहे. शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे यांनी सावंत यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याला चौगुले यांनी उत्तर दिले. चौगुले म्हणाले, सावंत यांचे पुतळे जाळू म्हणणाºया माणसाने अनेक शिवसैनिकांची घरे जाळली.
काँग्रेसला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करुन शिवसेना पक्षाची पडझड केली. यांच्या वागणुकीमुळे सेनेचे किती तरी नेते सोडून गेले. त्याची कुंडली आमच्याकडे आहे. त्याने जास्त तोंड उघडू नये. सोलापूर झेडपीत निवडून आलेला अध्यक्ष भाजपच्या ताकदीवर आला. पण उस्मानाबादेत भाजपचे लोक शिवसेनेसोबत आले. तिथे उपाध्यक्षपदासह तीन कमिट्या सेनेला मिळाल्या आहेत. सोलापुरात मोहिते-पाटील गटाच्या ताब्यात झेडपी आहे तर उस्मानाबादेत शिवसेनेच्या ताब्यात असणार आहे. ही गोष्ट समजून घ्यायला हवी. बाजारवृत्तीच्या नेत्यांना ती समजणार नाही. ३३ वर्षे सेनेची सेवा केली म्हणणारे लोकांनी नगरसेवकपदाची तिकिटे विकली. आपल्या प्रभागात निवडून येता आले नाही. दुसºयाच्या दावणीला बांधलेल्या लोकांनी निष्ठा शिकवू नये, अशी टीका चौगुले यांनी केली.
ठुमके लावणारे फोटो दाखवू का?
- चौगुले म्हणाले, परवा विधानसभेला शहर मध्यचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव झाला. आज सावंत यांना निष्ठा शिकविणारे लोक त्यावेळी विजयकुमार देशमुख यांच्या मिरवणुकीत ठुमके लावत होते. हवे तर फोटो दाखवू शकतो. सावंत दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. परंडा तालुक्यात विकासाचा डोंगर उभा केला. सोलापूरचे सह पालकमंत्री म्हणून काम करताना कामाचा धडाका दाखवला. जिल्हा शिवसेनेत शिस्त आली. अनेकांची दुकाने बंद झाली. ही गोष्ट सहन न झाल्याने काही लोक सावंत यांची बदनामी सुरू केली आहे. जे घडले नाही ते सांगितले जात आहे.
सावंत यांच्यामुळे नव्हे भाजपमुळे सेनेचा पराभव
जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात भाजपमुळे सेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. भाजपने बंडखोरांना आर्थिक रसद पुरविली. काही लोक याचे खापर सावंत यांच्यावर फोडत आहेत. हे चुकीचे आहे.