सोलापूर : जिल्ह्यामध्ये आमदार प्रशांत परिचारक, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला महाआघाडीचा प्रयोग बिलकुल ठप्प झालेला नाही. फक्त तो सध्या दिसत नाही, इतकंच. पक्षाच्या कुंपणावर असणाºया यातील काही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय जानेवारी एंडला होईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. दोन देशमुखांचे फारसे बिनसलेले नाही. त्यामुळे समझोत्याचा विषय नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा दौºयावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी ‘लोकमत भवन’ला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत मोहन डांगरे उपस्थित होते. शिवसेनेकडून होणारी कडवट टीका, सोलापूर जिल्ह्याचे राजकारण अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी सुमारे दीड तास दिलखुलास बातचीत झाली.
प्रश्न : पंढरपुरात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. सेनेने भाजपचा एवढा द्वेष केला नव्हता. तुम्ही तर युतीबद्दल बोलत आहात. या पार्श्वभूमीवर भाजप हतबल झालाय, असे वाटत नाही का?
दादा : छे छे... हतबलता काही नाही. आम्ही पूर्वी दोन खासदारांवर समाधानी होतो. आता तर केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. पुन्हा सत्ता येईलच. पण प्युअर नसेल. तीन राज्ये गेली म्हणून काय फरक पडत नाही. १९ राज्ये तर आहेतच. भाजप-सेना युती ही सर्वसामान्य माणसाची आवश्यकता आहे. चार पक्ष स्वतंत्रपणे लढले तर आम्ही क्रमांक एकवर असू. पण काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढले आणि भाजप व शिवसेना स्वतंत्र लढले तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारला फायदा होईल, असे सर्व्हे सांगतो.
प्रश्न : सध्याची स्थिती पाहता भाजपाला शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांची गरज आहे का?दादा : आता देशातील राजकारण बदललं आहे. केंद्रात सुद्धा १९८५ नंतर एका पक्षाला २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत. राजीव गांधी यांच्यानंतर विश्वनाथ, नरसिंहराव, अटलजी यांनाही आपल्या पक्षाचे २७१ सदस्य निवडून आणता आले नाहीत. पण प्रादेश्कि पक्षांना सोबत घ्यावे, अशी परिस्थिती आहे ना. विशेषत: दोन काँग्रेस ज्यांच्यामध्ये काही साम्य नसताना केवळ स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. आम्ही जर वेगळे लढलो तर त्याचा फायदा काँग्रेसला झाला पाहिजे, असे शिवसेनेने ठरविले असेल तर इट्स ओके. आमचं काही म्हणणं नाही.
प्रश्न : तुम्ही स्वतंत्र लढल्यानंतर शिवसेनेची परिस्थिती काय असेल? दादा : त्यांची स्थिती काय असेल हे माहीत असून बोलणं बरं नाही.
प्रश्न : स्वतंत्रपणे लढलात तर शिवसेना चार नंबरला जाईल का, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?पाटील : (जरा सावरत).. शिवसेना चार नंबरला जाईल, अशी तुम्ही बातमी केली तर कुठंतरी युती होण्याची शक्यता आहे, ती पण निघून जाईल. (जोरदार हंशा).
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर लक्ष आहे. जिल्ह्याच्या राजकारणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
प्रश्न : मोहिते-पाटील भाजपात ? उत्तर : प्रत्येक जण हुशार...प्रश्न : चार वर्षांपूर्वी तुम्ही प्रशांत परिचारक, आमदार बबनराव शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, राजेंद्र राऊत, संजय शिंदे यांना घेऊन महाआघाडीचा प्रयोग केला होता. ही मंडळी भाजपमध्ये येतील, असे बोलले जायचे. हा प्रयोग ठप्प झाला आहे. हे लोक भाजपमध्ये येतील का? - दादा : हा प्रयोग ठप्प झालेला नाही. पण तो सध्या दिसत नाही. आज मी बार्शीमध्ये राजा राऊत यांच्याकडे तासभर होतो. तिथे काही फक्त चहापाण्याच्या गप्पा झाल्या नाहीत. राजा राऊत यांच्यासोबत व्यूहरचनेबाबत चर्चा झाली.
प्रश्न : संजय शिंदे व इतर लोक काठावर आहेत त्यांचे काय होईल? दादा : लोकसभेची अधिसूचना जाहीर व्हायला चार महिने कालावधी आहे. पण जानेवारीएंडला लोकसभेची हवा तयार होईल. भाजप-सेना युतीचा निर्णय होईल. जे जे काठावर आहेत त्यांचाही निर्णय तेव्हाच होईल. त्यांना तो घ्यावा लागेल.
प्रश्न: मोहिते-पाटील भाजपमध्ये येतील का?- दादा : प्रत्येक जण हुशार आहे. आताच कोण पत्ते उघडणार नाही. प्रत्येक पक्षाचा जो विद्यमान खासदार आहे त्याला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. माढा, बारामती, कोल्हापूर अशा सहा जागांवरील उमेदवार जानेवारी एंडला निश्चित होतील. दोन भावांमध्ये भांडणं.. हे तर देशमुख
प्रश्न: भाजप-सेना एकत्र येतील, असा तुमचा विश्वास आहे. तसे आमचे दोन देशमुख कधी एकत्र येतील?- दादा : (हसत...) दोन देशमुख वेगळे आहेत हे परसेप्शन आहे. इंग्लिशमध्ये परसेप्शन आणि रिअॅलिटी दोन वेगळे शब्द आहेत. दोघेही एकत्र आहेत.
प्रश्न : दोन देशमुखांमध्ये समझोता करायचा प्रयत्न झालाय का?- दादा : असं मेजर बिघडलेलं नसल्यामुळे समझोत्याचा प्रश्न नाही. अहो दोन भाऊ घरामध्ये असले तरी भांडाभांडी होते. हे तर आडनावाने देशमुख आहेत. परवा विमानामध्ये दोघं एकमेकांशी खूप बोलत होते.
प्रश्न : विमानात दोघांमध्ये विषय काय सुरू होता?- दादा : (पुन्हा खदखदून हसले पण उत्तर दिलं नाही)
प्रश्न : गेल्या वेळी माढ्यातून सदाभाऊंनी निवडणूक लढविली. आता कोण उमेदवार असेल?- दादा : यावेळी भाजपच्या चिन्हावर माणूस असेल.
प्रश्न : उमेदवार कोण असेल? - दादा : तुम्ही इच्छुक आहात काय? (मिस्कीलपणे हसत प्रश्नकर्त्यालाच केला प्रतिप्रश्न).
प्रश्न: सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळेंचे नाव चर्चेत आहे?- दादा : आमची सत्ता आल्यानंतर इथे एक समन्वय हवा होता. अमर साबळेंना आम्ही इथे समन्वय साधण्यासाठी पाठविले आहे. साबळे यांची राज्यसभेची टर्म अजून साडेतीन-चार वर्षे आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही.
प्रश्न : गौडगाव मठातील जयसिद्धेश्वर महाराज यांच्या नावाचीही चर्चा आहे?- दादा : आताचे जे आमचे खासदार आहेत तेच उमेदवार असतील.
प्रश्न : पण ते सहा महिने झाले दिसले नाहीत हो?- दादा : (मिस्कीलपणे हसत) कोण उमेदवार असेल, असा प्रश्न विचारला. मी त्याचे उत्तर दिले.