उमेदवाराचे स्टेटस ठेवण्यावरून गुळपोळीत मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:24+5:302021-01-18T04:20:24+5:30
बार्शी : गुळपोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावातील एका उमेदवाराचे व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून शुभम सुरेश दुसंगे (वय ...
बार्शी : गुळपोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावातील एका उमेदवाराचे व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून शुभम सुरेश दुसंगे (वय २२, रा. गुळपोळी, ता. बार्शी) यास बोलावून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१६ जानेवारी रोजी दुपारी गुळपोळी येथील दूध संकलन केंद्रावर ही घटना घडली. याबाबत शुभम दसंगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय चंद्रकांत सावंत, गणेश सुखदेव चिकने, तुकाराम सुनील चिकने, नागेश मधुकर शिंदे, श्रीकांत शरद चिकने व इंद्रजीत सुखदेव चिकने (सर्व रा. गुळपोळी) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणालही ताब्यात घेतलेले नाही.
अधिक माहिती अशी की, या ग्रामपंचायतीची निवडणूक चालू असताना शुभम याने निवडणुकीतील उमेदवार निरंजन शांतीलाल चिकने याचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते. या कारणावरून त्यास गोड बोलून दूध संकलन केंद्रावर काम असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर ते येताच त्याबाबत विचारणा केली असता त्यास मारहाण करून तुझे हातपाय तोडून तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती. अधिक तपास हवालदार रियाज शेख करत आहेत.