सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. या दिवसापासून नामनिर्देशनपत्र विक्री आणि स्वीकृती जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. २६ मार्च हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शासकीय सुट्टी वगळता इतर दिवशी नामनिर्देशनपत्रे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंंद्र भोसले यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्ज मोफत देण्यात येत असला तरी दाखल करताना सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी २५ हजार तर राखीव गटातील उमेदवारासाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने या मतदारसंघातील सर्वच उमेदवारांना साडेबारा हजार रुपयांची अनामत भरावी लागणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत तीन शासकीय सुट्ट्या आहेत. यात एक धुलिवंदन, चौथा शनिवार, रविवार या तीनही दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी सांगितले. होलिकाष्टक असल्याने धुलिवंदनानंतरच २२ मार्चपासून नामनिर्देशनपत्रे दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२७ मार्च रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. २९ मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. १८ एप्रिल रोजी मतदान होईल. २३ मे रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिली.