गायी-म्हशी सांभाळणं झालं खर्चिक; त्यापेक्षा पाकिटातलं दूध परवडलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 05:04 PM2022-03-03T17:04:41+5:302022-03-03T17:04:47+5:30
शेतकऱ्यांची मानसिकता; दूध व्यवसाय आला तोट्यात
सोलापूर : सातत्याने पशुखाद्यांच्या किमतीत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. दुधाच्या खरेदीदरांत म्हणावी तेवढी वाढ होत नाही. पशुखाद्यांवरील खर्च, कामगारांची मजुरी, सालगड्यांची कमतरता यामुळे गाय, म्हैस सांभाळण्यापेक्षा पाकिटातलं दूधच विकत घेणं परवडतं, अशीच मानसिकता आता शेतकऱ्यांची होऊन बसली आहे.
पारंपरिक दुग्ध व्यवसाय करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना विविध समस्यांनी ग्रासलं आहे. शेती व्यवसायाला जोड म्हणून बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत असतात. पूर्वी मजूर मिळणे सुलभ होते, मात्र गेल्या चार वर्षांपासून मजुरांची कमतरता भासत आहे. शेती व्यवसायाकडे येणाऱ्यांची संख्याही घटत चालली आहे. पशुपालन करणे अडचणीचे होऊन बसले आहे. त्यात पशुखाद्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पशुखाद्याच्या तुलनेत दुधाचे दर वाढताना दिसून येत नाही, ही दुसरी अडचण आहे. तोट्यात चालणारा हा धंदा आणखी किती काळ करायचा, असा प्रश्न दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसमोर आहे.
स्पर्धा दुधासाठी दरांसाठी नाही...
राज्यात दूध उत्पादक सहकारी संस्थांची स्थिती नाजूक बनत चालली आहे. खाजगी दूध संकलन केंद्रांची वाढती संख्या, दूध डेअऱ्या, खाजगी दूध खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक यांचे जाळे दिवसेंदिवस पसरत चालले आहे. दूध खरेदीसाठी देण्यात येणारी आगाऊ रक्कम, वेळेत मिळणारे दुधाचे पेमेंट यात खाजगी दूध कंपन्या आघाडीवर आहेत. त्याचा फटका सहकारी संस्थांना बसत आहे. या संस्थांचे संकलन घटत चालले. दूध खरेदीसाठी कमालीची स्पर्धा असली तरी दूध दरवाढीबाबत शासनाच्या निर्णयाकडे बोट दाखवले जाते.
दुधाचे दर अनेकदा स्थिर राहतात. पशुखाद्य, स्थानिक चारा यांचे खरेदी दर मात्र सतत वाढताना दिसतात. दूध आणि पशुखाद्य दोन्हींच्या दरवाढीचे प्रमाण विषम असल्याने दुग्धव्यवसाय तोट्याचा झाला आहे.
-तुकाराम जाधव, दुग्ध व्यावसायिक
खाजगी दूध व्यवसायिकांची संख्या वाढली आहे. दूध खरेदी जागेवर येऊन करतात; मात्र सध्या मजूर मिळत नाहीत. या व्यवसायांत खूप कष्ट आहेत. त्याच्या कष्टाच्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. दूधदर वाढले तरच हा धंदा परवडतो.
- संभाजी भोपळे, दूध उत्पादक शेतकरी, मजरेवाडी