लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, या मागणीसाठी एका महिलेचा मृतदेह पंढरपूर-कुर्डूवाडी रस्त्यावर ठेऊन विठ्ठलवाडी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी गुरुवारी आंदोलन केले.
मृत महिलेचे नाव कौसाबाई ढालपे (वय ८०) असे आहे.
विठ्ठलवाडी विसावा येथे धरणग्रस्त लोक राहतात. या गावची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. नागरी सुविधेमधून २० गुंठे जागा स्मशानभूमीसाठी राखीव आहे. त्या जागेवर स्मशान भूमी करण्यासाठी १० निविदा मंजूर आहेत; परंतु आढीव हद्दीतील काही लोक स्मशानभूमी घराजवळ होत असल्याच्या कारणाने स्मशानभूमीच्या कामाला विरोध करत आहेत. यामुळे स्मशानभूमीचे काम सुरू झाले नाही. परिणामी विठ्ठलवाडी येथील मृत व्यक्तींना अंत्यविधीसाठी भटुंबरे व आढीव (ता. पंढरपूर) या गावात घेऊन जावे लागते.
स्मशानभूमीला जागा मिळत नाही, मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दुस-या गावाला जावे लागते. यामुळे वृधापकाळाने मृत झालेल्या कौसाबाई ढालपे यांचा मृतदेह पंढरपूर-कुर्डूवाडी या राष्ट्रीय महामार्गावर ठेऊन ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले.
याबाबत माहिती मिळताच प्रांत अधिकारी सचिन ढोले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यानंतर मृतदेह हलवण्यात आला.
यावेळी अजय खांडेकर, उत्तम जाधव, सुनील डांगे, पिंटू कदम, भय्या कांबळे, मोहन डुके, नागनाथ झेंडे, दादा शिंदे, गणेश ढालपे, गोरख ढालपे, छगन कांबळे, समाधान ढवळे, विकास डांगे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
----
विठ्ठलवाडी येथील ग्रामस्थांची पंढरपूर प्रांत कार्यालयामध्ये शनिवारी बैठक घेतली. या बैठकीस प्रांत अधिकारी सचिन ढाेले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर चार दिवसांमध्ये स्मशानभूमीचे काम सुरू करण्याबाबत आश्वासन दिले आहे. जर काम चालू झाले नाही, तर पुन्हा आंदोलन करणार आहे.
- अजय खांडेकर
ग्रामस्थ, विठ्ठलवाडी
:::::
आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
रस्त्यावर मृतदेह ठेऊन राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचे काम आंदोलनकर्त्यांनी केले आहे. यामुळे संबंधित आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
----
फोटो : २२ विठ्ठलवाडी
स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, या मागणीसाठी मृतदेह पंढरपूर-कुर्डूवाडी रस्त्यावर ठेऊन आंदोलन करताना विठ्ठलवाडी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थ.