राकेश कदम
सोलापूर : महापालिकेच्या उजनी आणि पाकणी पंपगृहात नवीन यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही पंपगृहात नवे वीज पंप बसविण्यात आले आहेत. नवीन यंत्रणा संगणकीय प्रणालीवर काम करणार आहे. दरम्यान, हे काम चालू असताना दुसरीकडे उजनीची पाणी पातळी कमी झाल्याने जलशयातून पूर्ण क्षमतेने दुबार पंपिंग सुरू झाले आहे.
उजनी ते पाकणी जलवाहिनीला २० वर्षे पूर्ण होत आली आहेत. दोन्ही पंपगृहातील यंत्रणा बदलण्याचे काम सुरू आहे. नव्या यंत्रणेबद्दल पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी म्हणाले, उजनी पंपगृहात सहाशे अश्वशक्तीच्या सहा विद्युत मोटारींच्या सहाय्याने पाणी उपसा केला जातो. या मोटारी कालबाह्य झाल्या आहेत. अनेकदा बंद पडतात. उजनी आणि पाकणी पंपगृहाच्या अत्याधुनिकरणासाठी महापालिकेने १२ कोटी २३ लाख रुपयांचा आराखडा तयार केला होता. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. सध्या उजनी पंपगृहात ६८५ अश्वशक्तीच्या तीन मोटारी बसविण्यात आल्या आहेत. यापैकी दोन मोटारी कार्यान्वित झाल्या आहेत. तिसरी मोटारही दोन दिवसांत सुरू होईल, असेही धनशेट्टी यांनी सांगितले. पूर्वी सहाशे अश्वशक्तीच्या मोटारीने पाणी उपसा व्हायचा. आता त्याची क्षमता वाढली आहे.
एकीकडे हे काम सुरू असताना दुसरीकडे दुबार पंपिंगचे कामही सुरू आहे. २३ पंपांद्वारे पाणी उपसा केला जात आहे.
विद्युत निरीक्षकांच्या प्रतीक्षेत पाकणी पंपगृह
- - सहापैकी दोन मोटारी बदलण्यात आल्या आहेत. नव्या मोटारींची क्षमता ३२५ अश्वशक्ती आहे.
- केंद्रीय विद्युत निरीक्षकांनी याची तपासणी केल्यानंतर या दोन मोटारी कार्यान्वित होतील. उजनी आणि पाकणी पंपगृहातील नव्या मोटारी मेअखेर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील.
उजनीतून निघालेले पाणी दीड तासात पाकणीला पोहोचते- उजनी ते पाकणी पंपगृहातील यंत्रणेचे काम सहायक अभियंता मनोज यलगुलवार पाहतात. यलगुलवार म्हणाले, उजनी ते पाकणी ही जलवाहिनी साधारणत: १०९ किमी आहे. उजनीतून मोटारीने पाणी उपसा केल्यानंतर ते मोहोळ तालुक्यातील खंडाळीपर्यंत पोहोचते. हे अंतर ४५ किमी आहे. खंडाळीजवळ ब्रेक प्रेशर टॅँक आहे. येथून गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी)ने पाकणी पंपगृहात पोहोचते. उजनीतून मोटारीने उपसलेले पाणी पाकणी पंपगृहात येण्यास दीड तासाचा कालावधी लागतो. या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती होती. ही गळती बंद करण्यात आली आहे.
पाईपलाईनवर वाढतंय अतिक्रमण - १९९८ साली उजनी पंपगृहाचे काम पूर्ण झाले. उजनी ते सोलापूर जलवाहिनीवर अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. अनेक लोकांनी पाईपलाईनवरच हॉटेल्स, टायर पंक्चरची दुकाने थाटली आहेत. पेट्रोलपंपालगतचे रस्तेही या पाईपलाईनवर आहेत. पाईपलाईनवरुन जड वाहने जातात. या अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणाचा फटकाही पाईपलाईनला बसणार आहे.
मोटारींना सेन्सर, ‘स्काडा’ ठेवणार लक्ष- मनपाच्या सर्वच पंपगृहांतील पाणीपुरवठ्याची यंत्रणा सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा अॅक्विझिशन (स्काडा) सिस्टीमवर चालणार आहे. नव्या मोटारींना सेन्सर आहेत. इलेक्ट्रिकल सिस्टिमही अत्याधुनिक आहे. यामुळे महापालिकेच्या कमांड अँड कंट्रोल रुममध्ये बसून या यंत्रणेवर लक्ष ठेवता येईल. कोणता पंप कधी सुरू आणि बंद झाला, बिघाड कशामुळे झाला, याचीही माहिती संगणक आणि मोबाईलवर पाहता येणार आहे.
इलेक्ट्रिक ट्रान्स्फॉर्मर यार्ड बदलणार- उजनी पंपगृहालगत इलेक्ट्रिक टान्स्फॉर्मर यार्ड असून, धरण १०० टक्के भरल्यानंतर या यार्डमध्ये गुडघाभर पाणी असते. या पाण्यात उतरुन अनेकदा दुरुस्तीची कामे करावी लागतात. हा प्रकार जीवावर बेतणारा आहे. त्यामुळे हे यार्ड पंपगृहाच्या समोरील मोकळ्या मैदानात हलविण्यात येत आहे. या यार्डच्या बांधकामासाठी २ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली असून, ही निविदा अंतिम टप्प्यात आहे. पाकणी पंपगृहात नवीन इलेक्ट्रिक यार्ड आहे. हे दोन्ही यार्ड अत्याधुनिक आणि बंदिस्त असतील, असे यलगुलवार यांनी सांगितले.