अकलूज-माळेवाडी नगरपरिषदेसाठी साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:03+5:302021-06-23T04:16:03+5:30

श्रीपूर : अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान यशवंत नगर, संग्रामनगर व ...

Chain fast for Akluj-Malewadi Municipal Council | अकलूज-माळेवाडी नगरपरिषदेसाठी साखळी उपोषण

अकलूज-माळेवाडी नगरपरिषदेसाठी साखळी उपोषण

Next

श्रीपूर : अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान यशवंत नगर, संग्रामनगर व इतर गावांचा अकलूज नगरपरिषदमध्ये का समावेश केला नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केला तर नगरपरिषदेबाबत कुठलाही अभ्यास न करता इतर गावांचा समावेश करण्याबाबतची चुकीची मागणी केली असा प्रत्यारोप भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला.

अकलूज-माळेवाडी नगरपरिषद तर नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी तीनही ठिकाणचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साखळी उपोषणास सुरुवात केली.

अकलूज येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण सुरू केले आहे. अकलूज-माळेवाडी नगरपरिषद तर नातेपुते नगरपंचायत करण्यात शासन दुजाभाव करत आहे. शासन जोपर्यंत यासंबंधीचा अंतिम आदेश काढत नाही तोपर्यंत या साखळी उपोषणातून उठणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, नातेपुतेचे माजी सरपंच ॲड. बी. वाय. राऊत, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, शिवसेनेचे दत्तात्रय पवार, आण्णा कुलकर्णी आरपीआय आठवले गटाचे नंदकुमार केंगार, किरण धाईंजे, अजित मोरे, प्रवीण साळवे, प्रद्युग्न गांधी, फातिमा पाटावाला, मुक्तार कोरबु, सतीश व्होरा, रणवीरसिंह देशमुख, प्रवीण काळे व अकलूज, माळेवाडी, नातेपुते ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

---

अकलूज नगरपरिषदचा प्रस्ताव करताना यशवंतनगर व संग्रामनगरजवळची गावे सोडून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेले माळेवाडी हे गाव नगरपरिषदेत सामावून का घेण्यात आले. अकलूज ग्रामपंचायतीमध्ये १९२२ साली स्थापन होणाऱ्या माळेवाडी, माळीनगर, यशवंतनगर, आनंदनगर, सवतगव्हाण, चौंडेश्वरीवाडी, बागेवाडी व संग्रामनगर या गावांचा समावेश होता. १९८५ साली नगरपरिषद होऊ नये यासाठी अकलूज ग्रामपंचायतीची फोड करून स्वतंत्र ग्रामपंचायती तयार केल्या. इतर गावांनाही समाविष्ठ करून घेतले असते तर त्यांचाही अकलूजबरोबर विकास झाला असता

- डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील

काँग्रेसचे नेते

----

गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषदेसाठी विविध पातळीवर पाठपुरवठा करत असताना अकलूजच्या नगरपरिषदेची फाईल ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अडवली गेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या भीतीपोटीच नगरपरिषदेचे अडवणूक केली जात आहे. नगरपरिषदेबाबत कुठलाही अभ्यास न करता इतर गावांचा समावेश करण्याबाबतची चुकीची मागणी केवळ वरिष्ठांना दाखविण्यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा वापर केला जात आहे,

- धैर्यशील मोहिते-पाटील

भाजप नेते

Web Title: Chain fast for Akluj-Malewadi Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.