चंद्रभागा वाळवंटी, झाली भक्तांची दाटी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:31 AM2018-07-23T01:31:41+5:302018-07-23T01:32:51+5:30
स्वच्छ, निर्मळ आणि वाहते पाणी असल्याने पवित्र स्नान करण्यासाठी ‘चंद्रभागा वाळवंटी भाविकांची दाटी’ झाल्याचे दिसून आले.
- प्रभू पुजारी
पंढरपूर :
‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान।
आणिक दर्शन विठोबाचे।।
हेचि घडो मज जन्मजन्मांतरी।
मागणे श्रीहरी नाही दुजे।।’
या संतवचनाप्रमाणे चंद्रभागा स्नानाला अधिक महत्त्व आहे़ त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच आपापल्या मठात, मंदिरात, धर्मशाळेत साहित्य ठेवून विश्रांती न घेता त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत होती़ सध्या चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी आहे़. स्वच्छ, निर्मळ आणि वाहते पाणी असल्याने पवित्र स्नान करण्यासाठी ‘चंद्रभागा वाळवंटी भाविकांची दाटी’ झाल्याचे दिसून आले़
गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात वरून विसर्ग येत आहे़ त्यामुळे आणि आषाढी वारी सोहळ्यात भाविकांचे हाल होऊ नये म्हणून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते़ ते पाणी चंद्रभागा पात्रात दाखल झाल्याने भाविकांना स्वच्छ, निर्मळ अन् वाहत्या पाण्यात पवित्र स्नान करण्याची संधी मिळत आहे़ स्नान झाल्यानंतर ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्यांच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे़ त्यामुळे भाविक प्रथम त्या भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात़ त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे मार्गस्थ होतात़ मंदिर समितीच्या वतीने गोपाळपूरच्या पुढे विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत दर्शन रांगेची सोय केली आहे़ दर्शन रांगेत यंदा प्रथमच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या पायाला क्रश खडी टोचू नये म्हणून मॅट अंथरले आहे़ तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी, कायमस्वरूपी पत्राशेड सोडून तात्पुरत्या पत्राशेडच्या संख्येतही वाढ केली आहे़ तसेच त्यामध्ये हायमास्ट दिवेही बसविले आहेत़ तासन्तास दर्शन रांगेत उभारून कंटाळलेल्या भाविकांसाठी बसण्याची सोयही केली आहे़ या सोयीसुविधा भाविकांना वेळेवर उपलब्ध होतात की नाही, याची स्वत: समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले दक्ष राहून पाहणी करीत आहेत़.