गुडेवारांच्या बदलीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे
By admin | Published: June 23, 2014 01:06 AM2014-06-23T01:06:13+5:302014-06-23T01:06:13+5:30
मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची पुन्हा ग्रामविकास खात्याकडे बदली करावी असा निर्णय घेण्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे;
सोलापूर: नगरविकास खात्याकडे प्रतिनियुक्तीवर आलेले मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची पुन्हा ग्रामविकास खात्याकडे बदली करावी असा निर्णय घेण्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे; मात्र यावर अद्याप निर्णय झाला नाही़ मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही क्षणी बदलीचा निर्णय होऊ शकतो़
राजकीय दबावापोटी मुख्यमंत्र्यांकडे त्यांची बदलीची मागणी केली होती त्यामुळे ही फाईल आता वेगाने पळू लागली आहे़ गुडेवार हे ग्रामविकास खात्याचे अधिकारी आहेत़ त्यांना प्रथमच नगरविकास खात्याकडे घेऊन सोलापूर महापालिकेचे आयुक्तपद दिले होते़ ४ जुलै २०१३ रोजी ते महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले़ वर्षभरात धडाकेबाज निर्णय घेऊन त्यांनी महापालिकेत चांगले दिवस आणले़ गुडेवार यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे अनेकजण दुखावले़ व्यापारी, राजकीय मंडळी विशेषत: सत्ताधारी मंडळी त्यांच्यावर नाराज होती़ गुडेवार रुजू झाल्यापासूनच ते सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहिले़ आता तर महापालिका आणि जिल्हा परिषद असा दुहेरी कारभार ते करीत असून रोजचा वार गुडेवार असे चित्र आहे़
त्यांची बदली होणार या चर्चेने सोलापुरातील वातावरण तापले असून अनेकांनी त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता राजकीय पक्ष, नागरिक आयुक्तांच्या बाजूने आहेत़ सोमवारी देखील माकप, भाजप, बसपा आदींनी बैठका व कार्यक्रम घेऊन पुढील दिशा ठरविण्याचे नियोजन केले आहे़
---------------------------------
मुख्यमंत्र्यांना नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देणार
मनपा आयुक्तचंद्रकांत गुडेवार यांची मुख्यमंत्र्यांनी बदली करु नये यासाठी सोमवारी सकाळी शहरात सह्यांची मोहीम राबविली जाणार असून सह्यांचे हे निवेदन मंगळवारी मुख्यमंत्र्यांना दिले जाणार असल्याची माहिती बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे़ आयुक्त गुडेवार यांनी महापालिकेत गेल्या वर्षभरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत़ अनेकांची दुकानदारी त्यांनी बंद केली असून राजकीय दबावापोटी जाणिवपूर्वक गुडेवार यांना बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे़ त्यामुळे एका चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी शहरवासीयांनी उभे राहावे, असे चंदनशिवे म्हणाले़