माढा : माढा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यामुळे मुलीच्या आईसह नवरदेवावर बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत पिडीत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने माढा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मोहोळ तालुक्यातील एका गावातील महेश तानाजी दांडगे याच्या घरी असलेल्या बाजीबाबा देवस्थान दर्शन घेण्यासाठी मुलीचे कुटुंबीय नेहमी जात असे. याच माध्यमातून मुलीच्या आईने पतीच्या परवानगीशिवाय आपल्या १४ वर्षीय मुलीचा सोमवार २१ रोजी रात्री नऊ वाजता राहत्या घरी लग्न लावून दिले. पीडित मुलीचे वडील कामावरुन आल्यानंतर मुलगी कोठे आहे याबाबत विचारणा केल्यावर मुलीचा विवाह महेश दांडगे यांच्याबरोबर लावून दिल्याचे सांगितले.
यावेळी मुलीचे वय कमी असल्याने लग्नाबाबत का कळविले नाही असा प्रश्न विचारल्यावर मला चांगले वाईट सर्व कळत असून दोघांचाही गळ्यात हार घातलेला लग्नाचा फोटो दाखविला. यामध्ये जोडवे, मंगळसुत्र दिसल्याने पत्नीच्या सहमतीने हा विवाह झाल्याचे समजताच पिडित मुलीच्या वडिलांनी पोलीसात धाव घेतली. यावेळेस महेश दांडगे, मुलीची आई यांच्यावर माढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महेश दांडगे व मुलीच्या आईस माढा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.