आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मांजापासून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व पशुपक्ष्यांसह मानवाला उद्भवणारा धोका कित्येक पटीने अधिक वाढला आहे. मागील वर्षभरात मांजामुळे शेकडो पक्षी, प्राणी जखमी झाले. शिवाय कित्येक पक्षी मृत्युमुखी पडले. दरम्यान, पक्षिमित्रांच्या सतर्कतेमुळे अनेक पक्ष्यांचे जीव वाचल्याचेही समोर आले आहे.
मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यासाठी आधी तिळगूळ, विविध फळांनी मुलांची लूट, हळदी-कुंकू इत्यादी कार्यक्रम, उपक्रम राबविले जायचे. आताही हे कार्यक्रम होतात; परंतु त्यापेक्षा मकरसंक्रांत म्हणजे पतंग उडविण्याचा सण, अशी व्याख्या झाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या काळात मांजात अडकून शेकडो पक्षी जखमी अथवा मृत्युमुखी पडल्याचे वन्यजीवप्रेमी संस्था, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, अग्निशामक दलाच्या पथकाने सांगितले. दरम्यान, बेकादेशीरपणे मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सोलापूर शहरात वन्यजीवप्रेमी संस्था, वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन फाउण्डेशन, अग्निशामक दलाच्या वतीने मांजात अडकलेल्यांना जीवदान देण्याचे काम अहोरात्र सुरूच आहे. आपला जीव धोक्यात घालून सोलापुरातील पक्षिमित्र पक्ष्यांना जीवदान देण्याचे का करतात. पूर्वी पतंगीला धागा बांधून तो उडविण्यात मुलांना आनंद मिळायचा, आता पतंग कापण्याची स्पर्धा चालते आणि त्यासाठी काचेची चूर लावलेला, न तुटणारा, नायलाॅनचा चायनीज मांजा वापरला जातो. मात्र त्यातून आनंद आणि मजा लुप्त होऊन पर्यावरणाचा ऱ्हास, पशुपक्ष्यांच्या आरोग्यासह मानवाच्या जिवाला अधिक धोका निर्माण झाला आहे.
..या पक्ष्यांना होतेय दुखापत
मांजामुळे सोलापूर शहर व परिसरात मागील वर्षभरात पारवा, घार, कावळा, चिमणी, साळुंकी, कोकिळा, हळद्या, गणेश पक्षी, बगळा, घुबड, कोतवाल पक्षी, सातभाई पक्षी, पोपट यासह अन्य पक्षी जखमी व मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, पक्षिमित्रांनी शेकडो पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम केले आहे.
पोलिसांकडून कारवाईच नाही
एखाद्या शहरात मोठी घटना घडली की, पोलिसांकडून तातडीने स्थानिक पातळीवर कारवाई करण्याबाबतचे आदेश पारित होतात, मात्र वास्तविक पाहता कोणावरही कारवाई होत नाही. विक्री करताना विक्रेत्याकडे मांजा आढळून आल्यास त्याला समज देऊन सोडण्यात येते, त्यामुळे दंडात्मक कारवाई आतापर्यंत कोणावरही झालेली नाही. कारवाई करण्याच्या मागणीसाठी पक्षिमित्रांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्याकडे अर्ज दिला होता, त्यानंतर त्यांनी आदेशही काढला मात्र कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.
चायनीज मांजा वापरावर बंदी असली तरी सोलापुरात विक्री होतेच. त्यातून मोठ्या प्रमाणात मनुष्य, पक्ष्यांची हानी होत असल्याने, पालकांनी संभावित धोके लक्षात घेता पाल्यांना चायनीज मांजा विकत घेणे टाळावे तसेच मुलांनीसुद्धा साध्या धाग्याचा उपयोग करून पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा.
- मुकुंद शेटे, पक्षिमित्र, वन्यजीवप्रेमी संस्था