सोलापुरातील क्लास टू अधिकारी पगार घेतात अर्धा लाख अन् लाच घेतात पाच हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 01:06 PM2022-01-10T13:06:25+5:302022-01-10T13:08:52+5:30
पाच हजार रुपयांपासून सात लाखांची लाच घेताना केली अटक
सोलापूर : शहर व जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये लाच घेताना अनेक अधिकारी व कर्मचारी रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत १२ क्लास टू अधिकारीही सापडले असून, त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कमीत कमी पाच हजारांपासून जास्तीत जास्त सात लाखांपर्यंत लाच स्वीकारताना सापडले आहेत.
शहर व जिल्ह्यातील जलसंधारण विभाग, सोलापूर महानगरपालिका, भूमी अभिलेख विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस खाते, ग्रंथालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग, आयटीआय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, राज्य कर विभाग आदी सरकारी कार्यालयांमध्ये काम करून देण्यासाठी किंवा कामात मदत करण्यासाठी लाच मागितल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधला होता. आलेल्या तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने संबंधित विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले होते. दोन वर्षांत महसूल आणि पोलीस खात्यामध्ये सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. दोन वर्षात ४९ कारवाया करण्यात आल्या असून, यामध्ये क्लास वन व क्लास टू अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस विभाग सर्वात पुढे
- विभाग २०२० २०२१
- महसूल ०४ ०३
- पोलीस ०३ ०८
- जिल्हा परिषद ०१ ०२
- े
सात लाखांची लाच घेतानाची सर्वात मोठी कारवाई
गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी २०२१ या सालात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला सात लाखांची लाच मागण्यात आली होती. सात लाखांची रोख रक्कम स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले होते. चौकशीमध्ये ही लाच पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरून घेण्यात येत होती असे पुढे आले. त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. सर्वात मोठी लाच घेताना झालेली वर्षातील ही कारवाई होती.
शासकीय कार्यालयामध्ये जर कोणी अधिकारी कर्मचारी लाच मागत असतील तर कायद्याने तो गुन्हा आहे. नागरिकांना लाच मागितल्यास संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी. तक्रारीची दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाईल.
- संजीव पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर.