मागच्या वेळी आपण नेरुर- माड्याचीवाडीची (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) ची माध्यमिक शाळा! तिथले अभिनव उपक्रम अनुभवले. चला, आता दुसºया शाळेत जाऊ... ही शाळा याच कुडाळ तालुक्यातली. बिंबवणे गावातली. लक्ष्मीनारायण विद्यालय, सावंतवाडी-गोवा महामार्गालगत. जुनी कौलारू इमारत.
सततच्या पावसाने शेवाळलेल्या भिंती अन् फरशा. छोटंसं मैदान. व्हॉलिबॉलचं मैदान आणि जाळी सांगत होती इथल्या मुलांचं कौतुक! ‘सीएम’चषक पटकावण्यापर्यंत मुलं पोहोचली! ही मुलं मैदानावर जेवढी खेळतात ना तेवढीच शाळेच्या गॅदरिंगला पारंपरिक दशावतार सादर करण्यातही रमतात. इथल्या मुलांचा परिपाठ हा एक संगीतमय सोहळा असतो.
शाळा संपण्याच्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो. मोठ्या जुन्या सभागृहात सगळी मुलं शिस्तीत बसलेली. दोन तबलजी, एक हार्मोनियम, एक सिंथेसायझर, एक साईड रिदम, दोन साऊंड आॅपरेटर! हे कुणी कुणी सरावलेले कलाकार नव्हते. ही वेगवेगळ्या वर्गातली मुलं होती. कुणी नववी, कुणी दहावी, कुणी पाचवी तर कुणी सातवी! सिंथेसायझर वाजवणाºया मुलाने हलकीशी खूण केली अन् एका ताला-सुरात प्रार्थना घुमू लागली... ‘तू बुद्धी, तू तेज दे..’, दुसरी प्रार्थना...‘ हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’... समोरच्या दीडशे मुलांचा एकच स्वर. एक लय. एकच शब्द. मणका ताठ, मान सरळ, हात जोडलेले, डोळे मिटलेले, चेहरे सौम्य आणि प्रसन्नही..!
प्रार्थना संपली. मुलांचे डोळे मिटलेलेच. प्रार्थनेचे तरंग वातावरणात, ऐकणाºयाच्या मनात रुजत जातात. ती शांतता अशीच काही काळ माझ्या मनात झिरपत गेली. खरं सांगू? या मुलांनी प्रार्थना मुखाने म्हटलीच नाही... हृदयानेच प्रार्थना जणू कोरली होती. अंतरीचा स्वर घेऊन ते म्हणत होते. शब्दात आर्तता होती, स्वरात सहजता होती. काहीकाळ ती प्रार्थना ते जगतच होते आणि मलाही त्यात सामील करून घेतलं होतं! त्या मुला-मुलींचे सौम्य, शांत,प्रसन्न आणि निश्चयी चेहरे असेच कायम राहोत!
विशेष म्हणजे या शाळेत कोणी संगीत मास्टर नाही. प्रत्येक वर्गाची भजन स्पर्धा घेतात. अट एकच. तबला पेटी वाजवणारेही त्याच वर्गातली मुलं असावीत. मग काय, मुलं धडपडून शिकतात. त्यातले जरा तरबेज वादक संपूर्ण शाळेसाठी वाजवतात. यामुळं होतं काय की, वाजवणारा, होतकरू विद्यार्थी शाळेतून बाहेर पडला तरी संगीत विभाग बंद पडत नाही. त्याची जागा दुसरा कोणी भरून काढतो. हे अनेक वर्षे छान चालू आहे..
दोन शाळा. दोन गावं. एकाच तालुक्यातल्या वेगळ्या संस्था. पण काही गोष्टी समान होत्या. शिक्षकांची अफाट जिद्द, कल्पकता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आस. हाताशी जी आणि जेवढी साधनं आहेत त्याच्या आधारावर पुढे जाण्याची इच्छाशक्ती. रडत बसणे नाही. तिथल्या एका शिक्षकाने खूप छान सांगितलं. ते म्हणाले, ‘समस्येमध्येच उत्तर दडलेलं असतं. ते बाहेर नसतंच!ह्ण वाक्य छोटं होतं पण मोलाचं होतं. वर्गापेक्षा वर्गाबाहेर, उघड्या आकाशाखाली मुलं जास्त शिकतात, बिन भिंतीची शाळा अधिक जिवंत अनुभव देते, हेच खरं!
या दोन्ही शाळांच्या भेटीने मला आनंद तरी दिलाच पण खूप शिकवलंही. या शाळा भेटीचा योग्य जुळवून आणला तो डॉ. प्रसाद देवधर या माझ्या मित्राने...त्याच्या बद्दलही लिहायला हवंच...पण फुरसतीने!!- माधव देशपांडे (लेखक उद्योग क्षेत्रात व्यवस्थापक आहेत)