२३ दिवसात वीजपुरवठा खंडितच्या १ लाख ३९ हजार वीजग्राहकांच्या तक्रारी
By appasaheb.patil | Published: May 19, 2020 04:15 PM2020-05-19T16:15:10+5:302020-05-19T16:19:41+5:30
वादळी वाºयासह पावसाचा फटका; महावितरणच्या विशेष पथकाकडून २४ तासांमध्ये तक्रारींचे निवारण
सोलापूर : गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या २३ दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण १ लाख ३९ हजार ७५१ तक्रारी महावितरणच्या मोबाईल अॅॅप, वेबसाईट, टोल फ्री क्रमांक आदींद्वारे केल्या असून, संबंधित तक्रारींचे २४ तासांच्या आत निराकरण केल्याची माहिती सोलापूरमहावितरणचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
आधुनिक जीवनाशी सुसंगत व अत्यंत सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरू असल्याने ही सेवा वीजग्राहकांसाठी अत्यंत सोईची ठरत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. गेल्या २३ दिवसांत राज्यातील ५३,१६० वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’ तर १५८३ वीजग्राहकांनी ‘एसएमएस’ सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे. यापैकी ३८ टक्के म्हणजे तब्बल ५३,१६० तक्रारी वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून, तर १५८३ तक्रारी ‘एसएमएस’द्वारे नोंदविलेल्या आहेत.
वीज गेली तर अशी करा तक्रार...
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२- ४१०७८५०० या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल द्यावा लागेल. तर ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक नाही. कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून ‘एसएमएस’द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र, १२ अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्यक आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून नो पॉवर (ठड ढडहएफ ) हा ‘एसएमएस’ महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसा ‘एसएमएस’ वीजग्राहकांना पाठविण्यात येईल. मात्र, ग्राहकाने दिलेला ग्राहक क्रमांक चुकीचा किंवा अवैध असल्यास तक्रार स्वीकारली जाणार नाही. याशिवाय महावितरणची वेबसाईट, मोबाईल अॅप तसेच २४ तास सुरू असलेल्या कॉल सेंटर किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार स्वीकारण्यात येत आहे.
परिमंडलनिहाय तक्रार नोंदविणारे वीजग्राहक
मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून तक्रार नोंदविणाºया वीजग्राहकांची संख्या पुढीलप्रमाणे. कल्याण परिमंडलमधील १०९२१, पुणे परिमंडल- ८७०४, भांडूप- ५४२६, नागपूर- ४८५२, नाशिक- ३९३९, कोल्हापूर- ३७०१, बारामती- २४२४, जळगाव- १६०९, औरंगाबाद- २०१४, अकोला- २५५५, अमरावती- १८०५, चंद्रपूर- ८२२, कोकण- ७८५, नांदेड- १४६६, गोंदिया- ७२५ आणि लातूर परिमंडलमधील १४१२ तक्रारींचा समावेश आहे.