सोलापूरच्या जीआयएस सर्वेक्षणामध्ये गडबड, चुकीच्या नोटीसांमुळे तक्रारी वाढल्याआॅनलाईन लोकमत राजकुमार सारोळे - सोलापूरमनपा प्रशासनाने मोठा गाजावाजा करून उत्पन्नवाढीसाठी वापरलेल्या जीआयएस (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सर्व्हिस) सर्वेक्षणातून फक्त १७ हजार मिळकतींचा शोध लागला आहे. ठेका घेतलेल्या कंपनीने अद्याप काम पूर्ण केलेले नाही व नवीन शोधलेल्या मिळकतींबाबत चुकीच्या नोटिसा पाठविल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पुण्याच्या सायबर टेक कंपनीला जीआयएस सर्वेक्षणाचा ठेका देण्यात आला आहे. ठेक्याच्या करारानुसार कंपनीने यापूर्वीच सर्वेक्षणाचे काम संपवायला हवे होते. पण कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सर्वेक्षणाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालले. कंपनीने जे सर्वेक्षण केले त्याबाबत आता अनेक शंका घेतल्या जात आहेत. सर्वेक्षणासाठी गेलेल्या सर्व्हेअरनी काही इमारतींचे मोजमाप न घेताच विरोध केल्याची नोंद करून नोटिसा काढल्या आहेत. त्यामुळे या इमारती कधीच्या आहेत याची खातरजमा कंपनीने केलेली नाही. चालू वर्षातील मिळकतकर भरलेल्या मिळकतदारांना इमारतीची नोंदच नाही, असे कारण दाखवून मागील दहा वर्षाच्या दंडासह कर दाखवून वाढीव उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले आहे. शहरातील ५२ पेठांपैकी ४९ पेठांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ४९ पेठात पूर्वीच्या ७९ हजार ८३ इमारतींची नोंद होती. सर्वेक्षणात १ लाख ८२ हजार ७७२ मिळकती आढळल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वेक्षणात नोंद नसलेल्या १७ हजार २५९ मिळकती आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. अद्याप बुधवारपेठ, विडी घरकुलसह काही पेठांचे काम झालेले नाही. यात ३४ हजार ४८८ मिळकती शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. भवानीपेठेत ६८८४ इमारतींची नोंद आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणात ११ हजार ९५८ इमारती आढळल्या आहेत. यात नोंद नसलेल्या ३३२३ मिळकती आढळल्या आहेत. ------------------------कंपनीला दोनवेळा मुदतवाढशहरात ५२ पेठात १ लाख ९९ हजार मिळकतींची नोंद आहे. जीआयएस सर्वेक्षणात नोंद नसलेल्या अनेक इमारतींचा शोध लागेल व महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल, असे सांगण्यात आले होते. सायबर टेक कंपनीला सर्वेक्षणाचा पाच कोटीला ठेका देण्यात आला. कंपनीने आॅगस्ट २0१६ अखेर काम संपवायला हवे होते. पण दोनवेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झाले नाही. आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांनी नोव्हेंबरमध्ये बैठक घेऊन डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचा कंपनीला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्याचबरोबर दंडात्मक कारवाई सुरू केली होती. डिसेंबरअखेर निवडणूक जाहीर झाल्यावर कंपनीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. आता तीन महिने जादा अवधी मिळूनसुद्धा अद्याप काम अपूर्ण आहे. प्रशासनाने दंडात्मक कारवाई किती केली, याबाबत माहिती मिळत नाही.-----------------------------असेसमेंटचे आॅडिट करासायबर टेक कंपनीने बऱ्याच ठिकाणी इमारतीचे प्रत्यक्षात मोजमाप घेतले नसल्याची तक्रार आहे. याबाबत थर्डपार्टी आॅडिट करा, असा सभेने ठराव केला आहे. पण प्रशासनाने याच्या अंमलबजावणीकडे कानाडोळा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुरेश फलमारी यांनी केली आहे. आयुक्त काळम-पाटील यांनी नव्याने शोध झालेल्या इमारतीचे असेसमेंट करून नोटिसा काढण्याचे आदेश दिले होते. त्यावर कंपनीने काही चुकीच्या नोटिसा काढल्याचे दिसून आले आहे. या नोटिसावरील तक्रारीची सुनावणी घेऊन कंपनीची चूक असेल तर दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी होत आहे.
सोलापूरच्या जीआयएस सर्वेक्षणामध्ये गडबड, चुकीच्या नोटीसांमुळे तक्रारी वाढल्या
By admin | Published: March 18, 2017 6:16 PM