आपसी बदलीने आलेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:00 AM2019-06-08T11:00:32+5:302019-06-08T11:01:54+5:30
सोलापूर जिल्ह्यातील तीनशे शिक्षकांचा प्रश्न; शिक्षण विभाग वारंवार धोरण बदलत असल्याचा आरोप
सोलापूर: दुर्गम भागात नोकरी करून आपसी बदलीद्वारे सोलापूर जिल्ह्यात नेमणुका झालेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबद्दल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून वारंवार धोरण बदलले जात आहे. जवळपास ३०० शिक्षकांच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे.
महाराष्टÑातील विविध जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास २५० ते ३०० शिक्षकांची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपसी बदलीने (आंतरजिल्हा) नियुक्ती करण्यात आली. महाराष्टÑ जिल्हा परिषद (सेवाप्रवेश) अधिनियम १९६७ क्र. ६ (८) आपसी बदलीनुसार आपसीने आलेल्या लोकांची ज्येष्ठता या दोहोंपैकी जी कमी असेल ती ग्राह्य धरावी, असे म्हटले आहे.
हा उल्लेख २८ जानेवारी २०१९ च्या शासन परिपत्रकामध्येही अंतर्भूत केला आहे. शासनाच्या आपसी आंतरजिल्हा बदली नेमणुकाच्या सर्व परिपत्रकांमध्येही असा उल्लेख आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाच्या या परिपत्रकानुसार १६ एप्रिल २०१९ च्या तारखेने सेवाज्येष्ठता लागू केली. यानंतर महिना लोटला आणि ४२ दिवसांनंतर पुन्हा शासनाचे कोणतेही आदेश नसताना २८ मे २०१९ च्या पत्रानुसार सेवाज्येष्ठतेला शिक्षण विभागाकडून स्थगिती देण्यात आली. या संदर्भात अनेक शिक्षकांनी विचारणा केली तरी शिक्षण विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे परशुराम कंजारे, संजय राजमाने, गौरप्पा गायकवाड यांच्यासह शिक्षकांचे म्हणणे आहे.
या प्रकाराबद्दल या शिक्षकांनी पाठपुरावा केला. यानंतर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शन मागवून स्थगिती उठवली. पुढील कार्यवाहीचे आदेश जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाºयांना दिले आणि सेवाज्येष्ठता धरून बदलीसाठी ग्राह्य धरावे, असा आदेश काढला. सेवापुस्तकामध्ये तशी नोंदणी घेण्यात आली. करंट मॅनेजमेंट बदलून बदलीस पात्र धरण्यात आले.
शासनाच्या मूळ आदेशाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा. कितीतरी वर्षे दुर्गम जिल्ह्यात नोकरी करून पुन्हा तेच आमच्या पदरी पडले आहे.
आमचा हक्क आम्हाला द्यावा, अशी मागणी या शिक्षकांमधून होऊ लागली आहे.
‘व्हॉट्सअॅप सूचना’ संदर्भ नुसती टोलवाटोलवी!
- आता सारं काही सुरळीत झाले म्हणून आपसीने बदलून आलेले शिक्षक सुटकेचा नि:श्वास टाकत असतानाच गुरुवारी ६ जून २०१९ च्या पत्रान्वये शासन संदर्भ नसताना मार्गदर्शन मागवूनसुद्धा अचानकपणे केवळ ‘व्हॉट्सअॅप सूचना’ असा संदर्भ बदलीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. प्रशासनाकडे एवढे पुरावे, परिपत्रक असतानाही चुकीच्या पद्धतीने आम्हाला अपात्र ठरवण्यात आले. आमच्यावर हा अन्याय होत आहे. व्हॉट्सअॅप सूचना हा संदर्भ म्हणजे निव्वळ टोलवाटोलवीचा प्रकार असल्याची कैफियत या शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.