सोलापुरातील काॅंग्रेस नेत्यांची उद्या मुंबईत तातडीची बैठक; जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 12:57 PM2021-03-16T12:57:39+5:302021-03-16T12:57:42+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
साेलापूर - शहर आणि जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या कामांचा आढावा आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेळे यांनी बुधवारी मुंबईत बैठक बाेलावली आहे. या बैठकीत काॅंग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा उपस्थित हाेईल, अशी चर्चा काॅंग्रेस भवनात आहे.
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्याकडे आल्यानंतर काॅंग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कार्यक्रम ठरवून देण्यात आले आहेत. संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बुधवारी बैठक हाेणार आहे. जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अशपाक बळाेरगी, शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुणकुमार शर्मा यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश आहेत.
काॅंग्रेसचे शहरातील पदाधिकारी केंद्र सरकारच्या विराेधात नेहमीच आक्रमक करतात. युवक काॅंग्रेस, महिला काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक कार्यक्रम राबविले जातात. आंदाेलने केली जातात. या तुलनेत जिल्हा काॅंग्रेसमध्ये फारसे काही हाेत नसल्याचा सूर पदाधिकाऱ्यांकडून काढला जाताे. जिल्हा काॅंग्रेसलाही आक्रमक चेहरा मिळावा अशी मागणाी अनेक तालुका पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली हाेती. प्रदेशाध्यक्ष नाना पटाेळे यांच्याकडे दक्षिण साेलापूर आणि अक्कलकाेट तालुक्यातील एक शिष्टमंडळही जाउन आले हाेते. बुधवारच्या बैठकीत यावर चर्चा हाेण्याची शक्यता आहे.
पाटलांना मुदतवाढ पण सुरेश हसापुरे यांचीही चर्चा
काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी प्रकाश पाटील यांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा आहे. शिवाय जिल्हा बॅंकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्याकडेही जिल्हाध्यक्षपद येईल, असेही काॅंग्रेस भवनातील लाेक सांगतात. जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, जिल्हा दूध संघासह इतर संस्थांमधील उलथापालथीमध्ये हसापुरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्नही सुरेश हसापुरे यांनी केला हाेता. त्यातूनच हसापुरे यांचे नाव चर्चेत आल्याचे दक्षिण साेलापूर तालुक्यातील काॅंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.