सोलापूर : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माढयाचे माजी आमदार धनाजी साठे व त्यांचे पुत्र दादासाहेब साठे यांनी गुरूवारी काँग्रेस भवनात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राज्यात भाजप - सेना युतीचे सरकार असताना माजी आमदार धनाजी साठे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आता राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर काँग्रेसमधून गेलेल्यांनी घरवापसीबाबत उत्सुक असल्याचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. याबाबत त्यांनी दोन दिवसांपुर्वी जाहीर वक्तत्व केले होते़ शिंदे याच्या वक्तत्वानंतर काँग्रेसमध्ये कोण परतणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये साठे यांचे नाव आघाडीवर होते़ साठे काँग्रेसमध्ये जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी बुधवारी दिली होती. पण गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, आ़ रामहरी रूपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, गटनेते चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, शिवलिंग सुकळे, गौरव खरात आदी उपस्थित होते. धनाजी साठे हे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जातात.