सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील जुन्या ड्रेनेजलाईन बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील तीन विभागात मोठी ड्रेनेजलाईन घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून एबीडी एरियातील (जुना गावठाण भाग: १0४0 एकर) ड्रेनेजलाईन जुन्या झाल्यामुळे वारंवार तुंबतात. जुनी लाईन व वाढीव लोकसंख्येमुळे डिस्चार्ज पेलवत नसल्याने सन २0५१ ची लोकसंख्या गृहित धरून त्या क्षमतेची ड्रेनेजलाईन घालण्याचे डिझाईन करण्यात आले आहे. या डिझाईनप्रमाणे लाईन टाकण्याचे टेंडर काढून ९ जानेवारीपासून कामाला सुरुवात करण्यात आली होती. आता या कामाने वेग घेतला आहे.
शहरात सिव्हिल चौक ते सातरस्ता, आदर्शनगर, म्युनसिपल कॉलनी या तीन ठिकाणी नव्याने ड्रेनेजलाईन घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ड्रेनेजलाईनचे काम झाल्यानंतर दुसºया बाजूने गरज असेल तेथे मोठी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सिव्हिल चौक ते गांधीनगर हा रस्ता नगरोत्थान योजनेतून एक वर्षापूर्वीच करण्यात आला होता. आता या कामासाठी नवीन रस्त्याची खोदाई करण्यात येत आहे. सोमवारी बेडरपुलावरही या कामासाठी खोदाई करण्यात आली. काम झाल्यानंतर आहे तशी परिस्थिती करून देण्याची ठेकेदारावर जबाबदारी आहे.
याचबरोबर स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील १३ रस्ते नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या रस्त्यांची खोदाई सुरू करण्यात आली आहे. हे रस्ते बनविताना ड्रेनेज, जलवाहिनी व वायरिंग रस्त्याच्या बाजूला घेण्यात येत आहे. असे अकरा किलोमीटरचे रस्ते खोदण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या या मोठ्या कामांमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असला तरी हे रस्ते पूर्ण झाल्यावर पुन्हा कोणत्याच कामासाठी खोदाई होणार नाही हे विशेष.
स्मार्ट सिटी योजनेतून जुनी ड्रेनेजलाईन बदलण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. नव्याने लाईन टाकून झाल्यावर जुनी ड्रेनेजलाईन बंद करण्यात येईल. हे काम झाल्यावर रस्ता जसा आहे तसा करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर देण्यात आलेली आहे. - संदीप कारंजे, नगर अभियंता