मंद्रूप येथे कुकरचा स्फोट; शेजारांच्या सतर्कतेमुळे गॅस गळती टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:34 PM2020-11-10T14:34:20+5:302020-11-10T14:34:25+5:30
गॅस गळती सुरू झाल्यावर शेजारचे धावून आले आणि त्यांनी सिलेंडरचे कनेक्शन बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जोडमोटे यांच्या घरात मंगळवारी सकाळी कुकरचा स्फोट झाला अन् गॅस शेगडी तुटली, गॅस गळती सुरू झाल्यावर शेजारचे धावून आले आणि त्यांनी सिलेंडरचे कनेक्शन बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.
अंबरनाथ रोड मोठे यांच्या पत्नीने मंगळवारी सकाळी डाळ शिजवण्यासाठी कुकर लावला आणि खरकटे पाणी टाकण्यासाठी त्या स्वयंपाक घरातून बाहेर गेल्या.अन् अचानक फटाके फुटल्यासारखा मोठा आवाज झाला.त्या धावतच घरात आल्या पाहतात तर काय स्वयंपाक घरात डाळीचे पाणी उडालेले अन गॅस शेगडीचे तुकडे झालेले त्यांना दिसून आले. आवाजाने शेजारी त्यांच्या घरात धावत आले गॅस शेगडी तुटल्याने बर्नरमधून गॅस गळती सुरू असल्याचे लक्षात येताच शेजार्यांनी सिलेंडरचे कॉक बंद केले.
कुकरची शिट्टी अडकल्याने वाफ कोंडून राहिली आणि वाफेच्या दाबाने कुकरचा स्फोट झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. सुदैवाने यात कोणालाही इजा न झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. स्फोटाने कुकरची शिट्टी इतक्या वेगाने छताच्या दिशेने गेली की छताच्या पत्र्याला छिद्र पडल्याचे दिसून आले.